आरंभ मराठी / तुळजापूर
सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरग्रस्त नागरिकांच्या दिवाळीत आशेचा किरण आणला आहे. कळंब तालुक्यातील हळदगाव येथे आज शनिवार, १८ ऑक्टोबर एकूण १४० शिधा किटचे वाटप करण्यात आले.
ही मदत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, यांच्या प्रेरणेने तसेच तहसिलदार व व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या किटमध्ये १७ जीवनावश्यक वस्तू डाळी, साखर, रवा, गूळ, गोडेतेल, चहा पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, लाल तिखट, मसाले आदी किराणा साहित्याचा समावेश होता.
शासनाच्या निर्णयानुसार मंदिर संस्थानमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचबरोबर सर्वांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अतिरिक्त एक दिवसाचे वेतन स्वखर्चाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अर्पण केले आहे. ही मदत त्यांनी आई तुळजाभवानीच्या सेवेसमान समजून केली आहे.
या मदत वितरणावेळी माया माने, तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), अनुप धमाले (सहायक व्यवस्थापक धार्मिक), राजकुमार भोसले (सहायक व्यवस्थापक स्थापत्य), जयसिंग पाटील, नागेश शितोळे, रमेश कवडे, गणेश नाईकवाडी, रवींद्र गायकवाड, कृष्णा डोलारे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा हा उपक्रम सामाजिक जाणिवेचा आदर्श नमुना ठरला असून, पूरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणारा आहे.