आरंभ मराठी इम्पॅक्ट
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव विभागातील बसस्थानकाच्या इमारतीचे पीओपी छत कोसळल्याच्या घटनेनंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. तसेच काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात दैनिक आरंभ मराठीने सर्वात आधी ऑनलाईनला तसेच दैनिकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
बसस्थानकाच्या दुरुस्ती व पुनर्विकासाच्या कामाची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून मे.साई कॉन्ट्रॅक्टर (लातूर) यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यात म्हटले आहे की, धाराशिव बसस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम कार्यादेशानुसार पूर्ण झालेले आहे. मात्र, बसस्थानकातील फॉल्स सीलिंग कोसळल्याची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे.
ही घटना अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निदर्शक असून, त्यामुळे कार्यालयास तात्काळ तपासणी करावी लागली. अशा घटनेमुळे महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असून, कामकाजाबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. सदर कामांच्या संदर्भात वारंवार तक्रारी येत आहेत.
त्यामुळे निविदेतील कलम क्रमांक 3 नुसार काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये,याबाबत लवकरात लवकर खुलासा करण्यात यावा.
काय आहे प्रकरण..?
धाराशिव बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.अनेक कामे बोगस झाल्याच्या तक्रारी असून,
काम पूर्ण झाल्यानंतर काही काळातच पीव्हीसी पॅनल सीलिंग कोसळले.यादरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे.
त्यामुळे प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे घडलेल्या या घटनेची सर्वात आधी दैनिक आरंभ मराठीने बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची महामंडळाने दखल घेतली असून, ठेकेदाराकडून तात्काळ छताची दुरुस्ती करण्यात आली आहे.
दरम्यान,
या घटनेमुळे महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नुकत्याच 10 कोट्यवधी रुपयांत उभारलेल्या या बसस्थानकाच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित होत आहे. प्रवाशांनीही दोषी ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.