आरंभ मराठी / धाराशिव
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजने’ अंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या महिन्यात सुमारे साडेतीन लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून, दिवाळी सणाच्या मुहूर्तावर हा हप्ता मिळाल्याने महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, केवायसी (KYC) ची अट या हप्त्यासाठी लागू राहणार नाही. त्यामुळे ज्यांच्या खात्यांमध्ये केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अशा महिलांनाही सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. तसेच, जून महिन्यापासून हप्ता थकलेल्या लाभार्थीनाही प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता असल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज, उद्या आणि परवा या तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील लाखो महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत मिळत असून, दिवाळीपूर्वी मिळणाऱ्या या हप्त्यामुळे महिलांना घरगुती खर्च, सणाची खरेदी आणि इतर गरजा भागवण्यास मोठा आधार मिळणार आहे.