आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांची माहिती, पाठपुराव्याला यश,
शासन निर्णय निर्गमित,
अद्ययावत वैद्यकीय संकुल उभारणीचा मार्ग मोकळा
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.महाविद्यालयासाठी तूर्त ६ हेक्टर ६२ आर जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन आदेश निर्गमित झाला असून, या निर्णयामुळे धाराशिवमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली असून, त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. शासन स्तरावर अडथळ्यात असलेला प्रश्न मार्गी लागला असून, यामुळे धाराशिवच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय सुरू होणार आहे.
शहरातील आयटीआयची जागा महाविद्यालयाला देण्यात येणार असून, त्यानंतर सिंचन विभागाची 3 हेक्टर जमीन मिळणार आहे.
उच्चस्तरीय सचिव समितीने यापूर्वीच या प्रकल्पास मंजुरी देत ४०३.८९ कोटी रुपयांच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत सुमारे आठ लाख २६ हजार चौरस फुट क्षेत्रावर हे वैद्यकीय संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृहे, कर्मचारी निवास, अधिष्ठाता निवास, सुरक्षारक्षक कक्ष, तसेच विश्रामगृह उभारले जाणार आहे.
याचबरोबर दंत महाविद्यालय, नर्सिंग, फार्मसी आणि भौतिकोपचारशास्त्र यासारख्या अभ्यासक्रमांचीही येथे सुरुवात होणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
दरम्यान, आयटीआयची मान्यता अबाधित ठेवण्यासाठी संस्थेकडे उपलब्ध असलेल्या १० हेक्टर ६२ आर क्षेत्रापैकी ४ हेक्टर जमीन आयटीआयकडे कायम राहणार असून, उर्वरित जमीन वैद्यकीय विभागाकडे देण्यात आली आहे. आयटीआयसाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आधुनिक तंत्रनिकेतनचे नवीन संकुल बांधले जाणार आहे.
जिल्ह्यात शिक्षण आणि आरोग्याच्या नव्या संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि आपल्या पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यात आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
_ राणा जगजितसिंह पाटील,आमदार