सायबर गुन्ह्यात धाराशिव येथील म्युच्युअल फंड वितरकाला फटका
आरंभ मराठी / धाराशिव
डिजिटल व्यवहाराच्या वाढत्या युगात ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असून, धाराशिव शहरातील दत्तनगर परिसरातील खंडेराव रघुनाथ कवडे (वय ४३, व्यवसाय, म्युच्युअल फंड व इन्शुरन्स डिस्ट्रीब्युटर) यांची तब्बल ४ लाख १ हजार ६८२ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.
संतोष मोनं, सुमित व अशोक शर्मा या अनोळखी आरोपींनी कवडे यांच्या एसबीआय, आयसीआयसीआय, अॅक्सिस व ए.यु. बँकेच्या क्रेडीट कार्डवरील माहिती मिळवून त्यांच्या परवानगीशिवाय व्यवहार केले.
फ्लिपकार्टवरून महागड्या वस्तूंची खरेदी करून त्या बिहार राज्यातील पटना विभागातील विविध पत्त्यांवर डिलिव्हरी केल्या गेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कवडे यांनी १ ऑक्टोबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
अशा प्रकारच्या फसवणुकीत आरोपींनी नवीन पद्धत वापरल्याचे दिसून येत आहे. खातेदाराची माहिती मिळवून थेट ऑनलाईन खरेदी केली जाते आणि पार्सल इतर राज्यांमध्ये पाठवले जाते. त्यामुळे खातेदाराला व्यवहाराची माहिती मिळेपर्यंत मोठी रक्कम गमवावी लागते. ही घटना नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. फसवणूक रोखण्यासाठी स्वतःची आर्थिक माहिती काटेकोरपणे जपणे आणि संशयास्पद कॉल, लिंक किंवा मेसेज यांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.
फसवणुकीची नवीन पद्धत,
क्रेडीट कार्डची माहिती मिळवत आरोपींनी फ्लिपकार्टवरून वस्तू खरेदी केली. व्यवहारांची परवानगी न घेता पार्सल बिहारमधील पटना विभागातील विविध पत्त्यांवर पोहोचवली गेली. खातेदाराला हे व्यवहार लक्षात येईपर्यंत तब्बल ४ लाख रुपयांचा तोटा झाला होता.
काळजी घेण्याचे आवाहन,
बँकेचे प्रतिनिधी म्हणून फोन करणाऱ्यांना कार्ड क्रमांक, ओटीपी किंवा सीव्हीव्ही देऊ नका. फक्त अधिकृत वेबसाईट किंवा अॅप्सवरूनच खरेदी करा. व्यवहारांची माहिती मिळावी म्हणून मोबाईलवर एसएमएस व ई-मेल अलर्ट सुरू ठेवा. कोणताही संशयास्पद व्यवहार दिसताच त्वरित सायबर पोलिसांना कळवा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.