आरंभ मराठी / धाराशिव
अतिवृष्टी, पूरस्थिती आणि ओल्या दुष्काळाच्या छायेत धाराशिव जिल्हा अडकलेला असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे दिवस-रात्र जनतेच्या मदतीसाठी धावपळ करत आहेत.
नुकसानीचे पंचनामे, मदत कार्याचा पाठपुरावा, मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यांचे समन्वयन, तसेच शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी नियोजन, या सर्व जबाबदाऱ्या ते यशस्वीरित्या पार पाडत आहेत.
मात्र, तुळजापूरच्या सांस्कृतिक महोत्सवात क्षणभर झालेल्या एका कृतीवरून त्यांच्या विरोधात समाजमाध्यमांतून टीका झाली आणि त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी करू नका, त्यांचे काम बघा,असा सूर निघत आहे.समाज माध्यमातून त्यांना जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्हाधिकारी पुजार यांनी स्वतः आपत्तीग्रस्त भागात उतरून मदतकार्याची पाहणी केली. पंचनाम्यांची गती वाढावी, शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले.
भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करताना महोत्सवही सुरळीत पार पडण्यासाठी नियोजन केले. त्यांच्या अशा संयमी आणि जबाबदार कार्यपद्धतीमुळे प्रशासनाची सकारात्मक छाप पडत असताना सांस्कृतिक महोत्सवात त्यांनी केलेल्या नृत्याचा मुद्दा पकडून त्यांच्यावर टीका झाली.पण आता त्यांच्या पाठिंब्यासाठी अनेकजण पुढे आले आहेत.
जिल्ह्यात यापूर्वी अनेक अधिकारी आले-गेले; मात्र पुजार यांनी खुलेपणाने संवाद साधत, समस्यांवर तोडगा काढत, लोकांशी मनमोकळ्या पद्धतीने काम केल्याने त्यांना वेगळी ओळख मिळाली असून, त्यांच्या कार्यकाळात जिल्हा प्रशासनाचे खंबीर नेतृत्व जनतेला लाभत आहे.
जिल्हाधिकारी पुजार हे चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त करणारे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कामावर ठाम राहून लोकांच्या पाठीशी उभे राहणारे अधिकारी आहेत. त्यांच्या बदनामीपेक्षा त्यांच्या कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असा सूर समाजमाध्यमातून व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, कावळेवाडी येथील सरपंच ॲड.अजित खोत, ॲड.शीतल चव्हाण, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप इंगळे, पत्रकार सुधीर पवार, डॉ.नितीन भराटे आदींनी त्यांच्या कार्यतत्पतेकडे लक्ष वेधले असून, त्यांच्या या प्रतिक्रियांना समाज माध्यमातून प्रतिसाद मिळत आहे.