पुण्याहून एनडीआरएफच्या दोन टीम बोलवल्या
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी (दि.26) रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या एका रात्रीत तब्बल 125 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
विशेषतः भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली असून, नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गावोगावी पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत.
सततच्या पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले असून, काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परिस्थितीची गंभीर दखल घेत पुणे येथून एनडीआरएफच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत. या पथकांकडून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
मात्र मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मागील दोन दिवसात काही प्रमाणात पाणी ओसरले होते. मात्र, भूम व परंडा तालुक्यातील शेतजमिनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्या आहेत.
मागील पावसातून काही प्रमाणात राहिलेल्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात एकाच रात्रीत सर्वदूर 125 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे हवामान तज्ञ सांगत आहेत. हा धोका आजही कायम असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे.
पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे आणि गोठे पाण्यात बुडाले असून, जनावरांचेही मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, आपत्कालीन पथके आणि स्थानिक स्वयंसेवक युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
काही गावांतील शाळा तात्पुरत्या निवाऱ्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. नदी-नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी देखील मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
आजही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, कालपेक्षा आज पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात विक्रमी पाऊस कोसळत असून, महाराष्ट्रात सरासरीच्या सर्वाधिक 160 टक्के पाऊस धाराशिव जिल्ह्यात पडला आहे.