आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या गुरुवारी (दि.२५) धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त भागात जाऊन ठाकरे त्याची पाहणी करणार आहेत. उद्या कळंब, वाशी आणि भूम तालुक्यातील काही भागात ते पाहणी करणार आहेत.
उद्या दुपारी साडेबारा वाजता ते कळंब तालुक्यातील ईटकूर येथील शेतीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी दीड वाजता ते वाशी तालुक्यातील पारगाव शिवारात पाहणी करतील. तसेच ते भूम तालुक्यातील काही भागात देखील पाहणी करतील.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे यांनी केंद्राला दहा हजार कोटींची मदत करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०२० मध्ये धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते.
त्यावेळीही ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यात येऊन पाहणी केली होती. उद्याच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांचाही समावेश असणार आहे.