आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे भूम व परांडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली.हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके जलमय झाली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अनेक घरांमध्ये, दुकांनांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या काळात जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासन, स्थानिक पोलीस, महसूल विभाग, एनडीआरएफ व स्वयंसेवी संस्था युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत भूम तालुक्यातील तांबेवाडी, इट, इडा या गावांतील १४ जणांची सुटका करण्यात आली. लाखी गावातील १२ जणांना बोटीने तर देवगाव येथील तब्बल २८ जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. रुई येथील १३ नागरिकांना बोटीने सुरक्षित स्थळी हलवले. परंडा तालुक्यातील घाटपिंपरी, वागेगव्हाण, वडनेर येथेही NDRF व आर्मीच्या टीम मदतीला दाखल झाल्या असून अंदाजे १५० नागरिकांना हलविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, सलग पावसामुळे जिल्ह्यातील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. काही पुलांवरून पाणी वाहू लागल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा आणि वीज कोसळण्याचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने घराबाहेर अनावश्यक न पडण्याचे, नदी-नाल्यांच्या काठावर न जाण्याचे व सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे.
परिस्थिती गंभीर पाहता जिल्हा प्रशासनाने उद्या (मंगळवार) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारी रात्री याबाबतचा आदेश काढला असून मंगळवारची स्थिती लक्षात घेऊन बुधवारी सुटीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.