आरंभ मराठी / धाराशिव
दुर्दैवी घटनेने जिल्हा हादरला आहे. पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
धाराशिव तालुक्यातील कोल्हेगाव येथील गावातील श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (३५) यांनी पत्नीला मारहाण करून ठार केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे कोल्हेगावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण टेकाळे यांचा विवाह दीड-दोन वर्षांपूर्वी झाला होता. ते पत्नी साक्षी टेकाळे (२८) हिच्यासोबत कोल्हेगावात राहत होते. रविवारी सकाळी किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. वाद चिघळताच श्रीकृष्ण यांनी पत्नीला मारहाण केली. यात साक्षीचा मृत्यू झाला. पत्नीचा जीव घेतल्यानंतर मानसिक ताणाखाली त्यांनी घरातच गळफास घेऊन जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच ढोकी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. घटनास्थळावरून एक चिठ्ठी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यातील मजकूर अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या घटनेमागे घरगुती वाद की आर्थिक विवंचना हे स्पष्ट झालेले नाही. तपास सुरू आहे.
गावात शोककळा
तरुण दांपत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण कोल्हेगावात हळहळ व्यक्त केली जात असून ही घटना परिसरासाठी मोठा धक्का मानला जात आहे.