आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरापासून सहा ते सात किलोमीटर दूर असलेल्या वरवंटी शिवारात आज सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे वाघाच्या हालचालीकडे असणारे अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर उठण्याची भीती निर्माण झाली आहे.
गुरुवारी (दि.४) सकाळी वरवंटी शिवारात महादेव टेकडीच्या परिसरात हा वाघ डोंगरावर मुक्तपणे संचार करत असलेला काही तरुणांना दिसून आला. वाघ सध्या ज्या ठिकाणी आहे तिथून वरवंटी गावचे अंतर जेमतेम एक किलोमीटर आहे.
तसेच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग देखील त्या परिसरातून दोन किलोमीटर अंतरावर आहे. वाघाचा सध्या या परिसरात मुक्त संचार सुरू असून, वनविभाग मात्र पूर्णतः गाफील असल्याचे चित्र दिसत आहे. या वाघाने सध्या जनावरांवर हल्ला केल्याचे आढळून आलेले नाही.
मात्र, वाघ दिसल्यानंतर काही तरुणांनी हुल्लडबाजी करत वाघाला हुसकावून लावले आहे. यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यातून डिसेंबर महिन्यात आलेला हा वाघ गेल्या नऊ महिन्यांपासून धाराशिव येथील येडशी-रामलिंग अभयारण्य परिसरात वास्तव्यास आहे.
ताडोबा आणि पुणे येथील रेस्क्यू टीमकडून या वाघाला पकडण्याचे तीन महिने प्रयत्न केले. त्यावर लाखो रुपये खर्च करूनही वाघ हाती लागला नाही. त्यानंतर वनविभागाने वाघ पकडण्याची मोहिनी गुंडाळली आहे. मागील दोन महिन्यांपासून हा वाघ पुन्हा सक्रिय झाला आहे.
वनविभागाने वाघावर लक्ष देणे देखील बंद केल्यामुळे या वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर आलेला वाघ शहरात घुसण्याची भीती असून, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.









