आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांची मराठा आंदोलनातील भूमिका दुहेरी ठरली. एकीकडे त्यांनी सरकारतर्फे आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मदत केली तर दुसरीकडे मुंबईत गेलेल्या आंदोलकांनाही मदतीचा हात दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी ठेवलेल्या मागण्यांवर विचारविनिमय करण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीसोबत तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांनीही मोलाचे योगदान दिले.
उपसमितीत अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, उदय सामंत यांच्यासह आमदार राणा पाटील यांनीही जरांगे पाटील यांची आझाद मैदानात भेट घेतली.
राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत असताना आमदार राणा पाटील हेदेखील विखे पाटील यांना काही मुद्दे सांगत होते. तसेच जरांगे पाटील यांना सरकारकडून दिलेला प्रस्ताव तयार करण्यात देखील आमदार राणा पाटील यांनी योगदान दिल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रीपद नसताना देखील आमदार राणा पाटील यांनी केलेली शिष्टाई आंदोलनाची कोंडी फोडण्यात यशस्वी झाली. यापूर्वी देखील जरांगे पाटील यांनी ज्या ज्या वेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते, त्या त्या वेळी सरकारतर्फे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राणा पाटील हे आंतरवली सराटी येथे गेले होते.
आमदार राणा पाटील यांनी यावेळी एकीकडे आंदोलकांना नेरुळ येथील त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून दिली होती. तर दुसरीकडे सरकारकडून जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी देखील प्रयत्न केल्याचे दिसले.
या आंदोलनात आमदार राणा पाटील यांनी दुहेरी भूमिका पार पाडून मराठा आंदोलकांचे आणि राज्य सरकारचेही त्यांनी लक्ष वेधले.









