चाळीशीच्या आतील ४२ तरुण शेतकऱ्यांनी नैराश्यातून जीवन संपवले
जिल्ह्यात दर आठवड्याला ३ शेतकरी आत्महत्या
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव –
धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या हा विषय दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालला आहे. नापिकी, शेतीपिकांना हमीभाव नसणे, नैसर्गिक संकटे, कर्जाचा विळखा यांमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेऊन जीवन संपवत आहेत.
जानेवारी ते जुलै या सात महिन्याता जिल्ह्यातील ८१ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या ८१ शेतकऱ्यांपैकी ४२ शेतकरी हे चाळीशीच्या आतील तरुण शेतकरी आहेत.
जिल्ह्यासाठी ही चिंताजनक गोष्ट असून, शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. धाराशिव जिल्ह्यात आठवड्याला तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये जुलै महिन्यात मोठी वाढ झाली असून, तब्बल १८ शेतकऱ्यांनी एकाच महिन्यात जीवन संपवले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील आत्महत्येचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाण्याची कमतरता, नापिकी, पिकांना योग्य भाव न मिळणे, नैसर्गिक आपत्ती आणि सरकारडकडून ठोस उपाययोजना नसणे अशा घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकरी नाउमेद होत असल्याचे चित्र दिसत आहे.
मागच्या वर्षी २०२४ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील १५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. जिल्ह्यात दर आठवड्याला तीन शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत धाराशिव जिल्हा मराठवाड्यात बीड नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आत्महत्येचा हा आलेख २०२५ या वर्षातही तसाच राहिल्याचे दिसत असून, आतापर्यंत १ जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या ८१ शेतकऱ्यांमध्ये ४२ तरुण शेतकऱ्यांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांचे वय तिशीच्या आत होते.
अशा २५ जणांनी स्वतःहून जीवन संपवले आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यात शासन व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जिल्हा प्रशासनाध्या नोंदणीनुसार मागच्या तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ४४० शेतक-यांनी आत्महत्या करून जीवन संपवले.
त्यापैकी १५७ शेतकरी हे पस्तिशीच्या आतील होते. धाराशिव जिल्ह्याचे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण शेजारच्या लातूर जिल्हापेक्षा दुप्पट आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता यवतमाळ नंतर राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या धाराशिव जिल्ह्यात झाल्या आहेत.
कर्जबाजारीपणा, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यांमुळे शेतकऱ्यांचे मनोबल दिवसेंदिवस कमजोर होत असून, शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शासन प्रशासनासह राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
विविध कारणांनी शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसल्यामुळे तरुण शेतकरी देखील टोकाचे पाऊल उचलत आहेत.
पीककर्ज न मिळाल्यामुळे खाजगी सावकाराकडून कर्ज
पीककर्ज मिळणे हा शेतकऱ्याचा अधिकार असतो. परंतु सरकारी बँका पिककर्ज वितरणात टाळाटाळ करतात. सीबील ची किचकट अट अजूनही पीककर्ज देताना तपासली जाते. शेतकऱ्यांना हक्काचे कर्ज न मिळाल्यामुळे शेतकरी खाजगी सावकारापुढे हात पसरतात. खाजगी सावकार भरमसाठ व्याजाने कर्ज देतात आणि हे कर्ज भरताना शेतकऱ्याच्या नाकीनऊ येते. निम्मा पावसाळा संपला तरी यावर्षी केवळ पन्नास टक्के पिककर्जाचे वितरण झाले आहे. सध्या जिल्ह्यातील ४५ हजार ५४३ शेतकऱ्यांकडे राष्ट्रयीकृत, खाजगी, क्षेत्रीय आणि डिसीसी व सहकारी बँकांचे एकूण ७७२ कोटी ३९ लाख रुपये कर्ज थकीत आहे. सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाही. परिणामी, थकबाकी वाढत जाऊन कर्जाचा डोंगर मोठा झाला आहे.
३५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून एक लाखांची मदत दिली जाते. आतापर्यंत ८१ पैकी ३५ शेतकऱ्यांना ही मदत करण्यात आली आहे. इतर शेतकऱ्यांचे मदतीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.
भूम तालुक्याचा आदर्श घ्यायला हवा
जिल्ह्यातील इतर तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असताना भूम तालुक्यात मात्र वेगळे चित्र दिसत आहे. भूम तालुक्यात सात महिन्यात केवळ एकाच शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भूम तालुक्यातील शेतकरी शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसाय करतात. शेतीतून अपेक्षित उत्पन्न आले नाही तरी दुग्धव्यवसायातून ती कसर भरून काढली जाते. दूध, खवा या शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे पर्याय शोधले आहेत. त्यामुळे भूम तालुक्यातील शेतकरी तुलनेने आर्थिक विवंचनेत नाहीत असे दिसते. भूम तालुक्याचा हा आदर्श इतर तालुक्यांनी घेतल्यास शेतकरी आत्महत्येवर आळा बसू शकतो. प्रशासनाने याबाबतीत प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोणत्या महिन्यात किती आत्महत्या झाल्या
जानेवारी – १०
फेब्रुवारी – १०
मार्च – ११
एप्रिल – १४
मे – ११
जून – ७
जुलै – १८
एकूण – ८१
तालुकानिहाय आत्महत्या
धाराशिव – १७
कळंब – ११
तुळजापूर – १६
उमरगा – ७
लोहारा – ३
परंडा – ९
वाशी – १७
भूम – १
एकूण – ८१