आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे पती-पत्नीचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करणाऱ्या आरोपी बाप लेकाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तात्काळ कारवाई करत चोवीस तासात आरोपींना पुणे शहरातून ताब्यात घेतले.
खून करून दोन्ही आरोपी पुण्याला नातलगांकडे पसार झाले होते. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, करजखेडा येथे बुधवारी दुपारी आरोपी जीवन हरिबा चव्हाण याने शेतीच्या वादातून सहदेव पवार आणि प्रियांका पवार यांची भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती.
त्यानंतर आरोपी फरार झाले होते. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि बेंबळी पोलीस आरोपींच्या मागावर होते. यातील आरोपी जीवन हरीबा चव्हाण आणि हरीबा यशवंत चव्हाण हे बापलेक पुणे येथे नातलगांकडे पळून गेल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने पुणे येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेतला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
पुणे शहरातील जनता वसाहत, पर्वती पायथा येथून त्यांना ताब्यात घेतले आणि रात्रीतून धाराशिव शहरात आणण्यात आले. दोघांचीही वैद्यकीय तपासणी करून त्यांना बेंबळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.