धाराशिव तालुक्यातील घटनेने खळबळ
धाराशिव : तुळजापूर ते लातूर महामार्गावरील करजखेडा गावात आज दुपारी भर चौकात जमिनीच्या जुन्या वादातून पती-पत्नीचा निर्घृण खून झाल्याने परिसर हादरला आहे. मृतांमध्ये सहदेव पवार आणि प्रियांका पवार या दाम्पत्याचा समावेश असून, हल्ला बाप-लेकासह त्यांच्या साथीदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी प्रथम दाम्पत्यावर भरधाव गाडी चढवून त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर थांबण्याऐवजी, कोयत्याने वार करून दोघांना जागीच ठार मारण्यात आले. या अमानुष हल्ल्यामुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सहदेव पवार आणि आरोपी जीवन चव्हाण यांच्यातील जमिनीच्या बांधावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. याच वादात पूर्वी सहदेव पवार यांच्यावर कलम 307 अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होऊन ते तुरुंगात होते. अलीकडेच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता. मात्र जामिनावर बाहेर पडताच चव्हाण याच्यासह त्याच्या वडिलांनी पवार दापंत्याचे सूडाच्या भावनेतून हत्याकांड केल्याची शक्यता पोलिस तपासात व्यक्त होत आहे.
घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला आहे. या हत्याकांडात दोन नव्हे तर पाच आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांचा अंदाज असून, आरोपींचा शोध सुरू आहे.