आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेली स्थगिती उठवत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे थांबलेले प्रश्न लवकर मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे.
भूम-परांड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेशाचा सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठवत असल्याचे जाहीर केले.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत मंगळवारी एक बैठक घेतल्याचे स्पष्ट केले. या बैठकीत स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ही स्थगिती उठवत असताना महायुतीतील तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधिंना ठरलेल्या सूत्राप्रमाणे निधी देण्याचे कबूल केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नसला तरी जिल्हा नियोजन समितीच्या कामातील काही निधी राष्ट्रवादी पक्षाला मिळणार असल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल मोटे यांना महायुतीतील इतर पक्षांच्या नेत्यांसोबत जुळवून घेण्यास सांगितले.
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिल्यामुळे महायुतीतीलच तीन पक्षात कलगीतुरा रंगला होता. 25 मार्च रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यासाठीचे पत्र जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दिले होते.
आमदार राणा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामात अनियमितता असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी स्थगिती देण्याचा आदेश दिला होता.
मागील साडेचार महिन्यांपासून जिल्हयातील 268 कोटींची विकासकामे ठप्प असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसे सामोरे जावे असा प्रश्न महायुतीतील नेत्यांना पडला होता. आता स्थगिती उठवल्यामुळे सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.