दुहेरी लाभासह अन्य निकषात न बसल्याने लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव –
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत राज्यात सुरू असलेल्या तपासणीत सुमारे २६ लाख ३४ हजार महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. धाराशिव जिल्ह्यात सुमारे ३ लाख ८८ हजार महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
त्यातून दुहेरी लाभ घेणाऱ्या आणि निकषात न बसणाऱ्या तब्बल ४० हजार महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याचे समजते. योजनेची वर्षपूर्ती होत असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात योजनेतून महिलांना वगळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या महिलांना दोन टप्प्यात वगळले असून, काही महिलांना मे महिन्यातील हप्त्याचे वितरण केलेले नाही तर काही महिलांना जून महिन्यातील हप्त्याचे वितरण केलेले नाही. निकषांची काटेकोर अंमलबजावणी करून यापुढे जास्तीत जास्त महिलांना या योजनेतून बाद केले जाईल अशीही माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जांची ओळख पटवण्यासाठी
महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती.
त्यात धाराशिव जिल्ह्यातील जवळपास ४० हजार महिला लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर झाली. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे तर काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले.
इतकेच नाही तर काही ठिकाणी चक्क पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून जिल्ह्यातील ४० हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ३ लाख ८८ हजार महिलांना मे महिन्याचा लाभ देण्यात आला होता. तर जून महिन्याचा लाभ जवळपास ३ लाख ४५ हजार महिलांनाच देण्यात आल्याचे समोर आले आहे. म्हणजे जिल्ह्यातील ४३ हजार महिलांना जून महिन्यात हप्ता वितरित करण्यात आला नाही.
तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ८१ महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज दाखल केले असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली. अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे, आर्थिक स्वावलंबन प्राप्त व्हावे यासाठी महायुती सरकारने जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
योजनेनुसार आर्थिक स्वावलंबनासाठी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज दाखल केले. सरकारी नोकरी करणाऱ्या, चारचाकी वापरणाऱ्या, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला तथा शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींची नावे वगळण्याचा सध्या सपाटा लावला आहे. यापुढेही दर महिन्याला या योजनेतून हजारो नावे बाद होणार आहेत.
शासनाचे ६ कोटी रुपये वाचले
धाराशिव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता वितरित झाल्यानंतर ५८ कोटी रुपयांचे वाटप होते. जून महिन्यात ४३००० महिलांना योजनेतून अपात्र केल्यामुळे ५२ कोटी रुपयांचे वाटप झाले. म्हणजे एका महिन्यात शासनाचे तब्बल ६ कोटी रुपये वाचले आहेत.
जिल्हा पातळीवर फक्त तक्रारींची नोंद
लाडकी बहीण योजनेचा लाभबंद झाला की महिला जिल्हा महिला व बाल विभागाकडे तक्रार करण्यासाठी येतात तेंव्हाच विभागाला त्यांचा लाभबंद झाल्याचे कळते. त्यानंतर ते महिलेचा अर्ज, आधार व अन्य संबंधित कागदपत्रे तपासून त्यांचे कारण सांगतात. सध्या या कार्यालयाकडे अशा तक्रारींचे ढीग साचले आहेत.
रक्षाबंधन सणाला मिळणार पुढील हप्ता
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अजूनही वितरित केलेला नाही. बुधवारी सरकारने जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आर्थिक तरतूद केली. त्यानुसार पुढील आठवड्यात रक्षाबंधन सणाला हा हप्ता वितरित होईल. यावेळीही हजारो महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. ज्या महिलांना हप्ता मिळणार नाही त्यांचे नाव योजनेतून बाद करण्यात आल्याचे समजावे असे शासनानेच सांगितले आहे.
* योजनेसाठी अर्ज केलेल्या महिला – ४,१८,०००
* बाद केलेले अर्ज – ३०,०००
* पात्र लाभार्थी – ३,८८,०००
* कार, इन्कम टॅक्समुळे बाद – ११००
* स्वतःहून लाभ नाकारलेल्या महिला – ८१
* मे आणि जून महिन्यात वगळलेल्या महिला – ४३,०००
* सध्या असणाऱ्या लाभार्थी महिला – ३,४५,०००