आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्यात एकमेव स्त्री रुग्णालय अस्तित्वात असून, या रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. पण सध्या हे रुग्णालय या वाढत असलेल्या ताणामुळे नव्हे तर साप, उंदरांच्या उपद्रवाने हतबल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात साप आढळून येत असून, परिसरात वाढलेले गवत, छताला लागलेली गळती, तुटलेल्या खिडक्या, दरवाजे, यामुळे येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. 2 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही दुरुस्ती न केल्याने रूग्णालयातील समस्या वाढल्या आहेत.
रुग्णालयाच्या परिसरात भोगावती नदीच्या जवळ तसेच रुग्णालयाच्या सभोवताली गवत वाढले आहे. दरवाजे तुटलेले, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा,परिणामी उंदरांचा आणि सापांचा वावर वाढला आहे.
रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर उंदरांनी अनेक ठिकाणी वायर्स कुरतडले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात दोन वेळा रुग्णालयात शॉर्ट सर्किटची घटना घडली. रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका उत्पन्न झाला आहे.
या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्र दिले आहेत, तरीही बांधकाम प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे दुरुस्तीची कामे केली जात नाहीत. त्यामुळे इथल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 2 कोटींचा निधी मंजूर होऊन देखील रुग्णालयात दुरुस्तीची कामे होत नसल्याने बांधकाम प्रशासनाची झोप कधी संपणार आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान रुग्णालयात साप आढळू लागल्याने रुग्णालय प्रशासनाने भिंतीवर सर्प मित्रांचे नंबर लिहून ठेवले आहेत. कारण काही दिवसांपूर्वी रुग्णालयात मध्यरात्री साप आढळून आले होते. अखेर कर्मचाऱ्यांनी हे साप अथक प्रयत्न करून बाहेर काढले. अशा निष्कीय प्रशासनाला जाब कोण विचारणार, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांच्या आणि त्यांच्या नवजात बालकांच्या जीवाला धोका असताना या प्रकाराकडे कुणी पाहायला तयार नसल्याने संताप व्यक्त होत आहे.