आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्याच्या इतिहासात पहिले देहदान मंगळवारी (दि.२२) झाले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेतून हे देहदान झाले असून, ७० वर्षीय महिलेचे हे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अवयवदान, नेत्रदान या क्षेत्राबद्दल बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. मात्र, देहदानाबद्दल अजूनही म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. मात्र, मंगळवारी जिल्ह्यात देहदानाची ऐतिहासिक घटना घडली असून, सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाला हे देहदान करण्यात आले. याचा उपयोग वैद्यकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टरांना होणार असून, न्यायवैद्यकशास्त्र विभागाने याची सर्व प्रक्रिया पार पाडली.
धाराशिव शहरातील श्रीमती मंगल बाबुराव मुंडे (७०) या मागील काही दिवसांपासून किरकोळ आजाराने त्रस्त होत्या. त्यांचा सांभाळ दीपा कल्याण जाधव या करत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना धाराशिव शहरातील निरामय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि.२२) सकाळी नऊ वाजता कार्डियाक अरेस्ट मुळे त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच त्यांच्या मुलीने दीपा कल्याण जाधव यांनी आईच्या मृतदेहाचे देहदान करावे अशी इच्छा व्यक्त केली. दीपा जाधव या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम या संस्थेशी संबंधित धार्मिक कार्य करतात.
याच संस्थेच्या मदतीने त्यांनी आईचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय सोपा नव्हता. नातलग, पाहुणे यांना याबद्दल माहिती दिल्यानंतर काही जणांनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी याला विरोध दर्शविला.
परंतु, जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेच्या साधकांनी या निर्णयात त्यांची मदत केली. जवळच्या काही नातलगांनी केलेल्या विरोधाला संवादातून मार्ग काढत सर्वांच्या सहमतीने अखेर देहदानाचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
यासंबंधीची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांना देण्यात आली. डॉ.चौहान यांनी तात्काळ न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या डॉ.स्वाती पांढरे यांना यासंबंधी सूचना दिल्या आणि देहदानाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
यावेळी देहदानासोबतच नेत्रदान करण्याचा देखील निर्णय घेतल्यामुळे त्याबाबतीतही प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली. यावेळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेच्या धाराशीव जिल्ह्यातील साधकांनी या संपूर्ण प्रक्रियेत महाविद्यालयाला मदत केली.
अखेर सायंकाळी चार वाजता संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात देण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील देहदानाची ही पहिलीच केस असल्यामुळे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांनी दीपा जाधव आणि
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेचे आभार मानले.
वैद्यकीय महाविद्यालयाकडे जिल्ह्यातील पहिला मृतदेह
धाराशिव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊन चार वर्षे पूर्ण झाली. यावर्षी महाविद्यालयातील पहिली बॅच डॉक्टर होऊन बाहेर पडणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आणि शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना न्यायवैद्यकशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मानवी देह अभ्यासावा लागतो.
मेडिकल कॉलेजने असे दहा मृतदेह अभ्यासासाठी बाहेरून आणलेले आहेत. मागील चार वर्षात कॉलेजला स्थानिक पातळीवर एकही देहदान न झाल्यामुळे मृतदेह बाहेरून मागवावे लागले होते. मात्र, धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच देहदान झाल्यामुळे आता मेडिकल कॉलेजला याच जिल्ह्यातील मृतदेह मिळाला आहे. याचा फायदा इथे शिकणाऱ्या डॉक्टरांना होणार आहे.
अवयवदान आणि देहदानासाठी जनजागृती गरजेची
रक्तदानाप्रमाणे अवयवदान, नेत्रदान, देहदान यासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षात याबाबतीत जिल्ह्यात नेत्रदान आणि अवयवदानाच्या काही घटना घडल्या आहेत. मात्र, त्यामध्ये वाढ होण्याची गरज आहे. ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने करणे शक्य आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव इतरांचे प्राण वाचवू शकतात, हे पटवून दिल्यास अवयवदानासाठी लोक तयार होऊ शकतात. नैसर्गिक मृत्यू आलेल्या निरोगी व्यक्तीचा देह हा वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासासाठी स्वीकारला जातो. महाविद्यालयाच्या वेबसाईटवर देहदान आणि अवयवदान यांचे फॉर्म उपलब्ध आहेत.
देहदानाची जिल्ह्यातील पहिलीच घटना
देहदानाची धाराशिव जिल्ह्यातील पहिलीच घटना घडली आहे. हा निर्णय घेणाऱ्या कुटुंबियांचे आम्हाला खूप कौतुक आहे. ही एक सुरुवात आहे, यापुढे लोक पुढे येऊन देहदानाचे आणि अवयवदानाचे निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. पाप पुण्याच्या बाहेर जाऊन लोकांनी आता विचार करायला हवा. अवयवदान आणि देहदान केल्याने कमीत कमी 7 ते 8 व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. तसेच कुटुंबातील सदस्य अवयवदान केलेल्या व्यक्तीच्या रुपात त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा पाहू शकतात. धाराशिव जिल्ह्यात देहदान आणि अवयवदानाच्या बाबतीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रयत्न करत आहे.
डॉ. शैलेंद्र चौहान,
वैद्यकीय अधिष्ठाता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,