आरंभ मराठी / धाराशिव
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे धाराशिव दौऱ्यावर येत आहेत.
त्यातच आज सकाळी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे शहरभर लावण्यात आलेले पोस्टर फाडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचे पोस्टर फाडून त्यावर दगडफेक केली.
यामध्ये तिथे लावलेल्या काही गाड्यांचे काच फुटले. छावा चे आक्रमक कार्यकर्ते त्यानंतर सर्व पोस्टर फाडत सुनील प्लाझा येथील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर गेले. त्याठिकाणी मोठमोठ्याने घोषणा देत आक्रमक कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी छावा च्या कार्यकर्त्यांना ऑफिसमध्ये घुसण्यापासून रोखले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. छावा च्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमोर पत्ते उधळत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि सूरज चव्हाण यांच्याविरोधात घोषणा दिल्या.
यावेळी छावा च्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या पोस्टरवर दगडफेक केल्यानंतर वातावरण चिघळले. यावेळी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे दिसले, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
छावा च्या काही कार्यकर्त्यांना आनंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेत पत्ते खेळत असल्याचा एक व्हिडिओ काल सकाळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर टाकल्यानंतर या वादाला सुरुवात झाली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काल लातूर दौऱ्यावर असताना छावा चे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू असताना मध्ये गेले आणि त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन तटकरे यांच्यासमोर त्यांनी पत्ते उधळले होते.
या घटनेनंतर काही वेळातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन विजयकुमार घाडगे यांच्यासह छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून, लातूर, नांदेड आणि धाराशिव मध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे पोस्टर फाडले आहेत.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले असून, आज ते काही वेळातच धाराशिवमध्ये येणार आहेत. लातूर प्रमाणे धाराशिव मध्ये देखील छावासह इतर संघटनांनी सूरज चव्हाण यांच्या कृतीचा बदला घेतला जाईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे.