आरंभ मराठी / धाराशिव
मराठा समाजाला दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जाणूनबुजून दिली जात नसल्याचा आरोप करत धाराशिव येथील मराठा समाजाच्या तरुणांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर आक्रोश करत त्यांना घेराव घातला.
हरित धाराशिव अभियानासाठी धाराशिव दौऱ्यावर आलेले पालकमंत्री सरनाईक हे शिंगोली येथील कार्यक्रम संपल्यानंतर सर्किट हाऊसमध्ये जात असताना मराठा तरुणांनी मोठा राडा घातला. यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी तरुणांची बाजू शांतपणे ऐकून घेतली.
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला शिंदे समितीच्या शिफारशीनंतर नोंदी पाहून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात देखील कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले जात होते. मात्र, मागील वर्षापासून
मराठा समाजाला दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रे मुद्दाम दिली जात नसल्याचा आरोप मराठा समाजाच्या तरुणांनी केला होता.
काही महिन्यांपूर्वी जात पडताळणी कार्यालयात देखील काही तरुणांनी ठिय्या मांडून या प्रश्नावर आंदोलन केले होते. मात्र, सतत आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याची तरुणांची भावना आहे. त्यामुळेच मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.
मराठा समाजाचे प्रश्न मुद्दाम सोडवले जात नाहीत असा आरोप यावेळी उपस्थित तरुणांनी सरनाईक यांच्यासमोर केला. सरनाईक यांनी तात्काळ सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांना फोन करून या प्रश्नाची माहिती दिली.
त्यानंतर सामाजिक न्याय मंत्र्यांनी समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांना ताबडतोब सर्किट हाऊसवर जाण्याचे फर्मान सोडले. हा संपूर्ण गोंधळ जवळपास अर्धा तास सुरू होता. मराठा समाजाचे जवळपास 700 प्रमाणपत्र कार्यालयात अडवून ठेवले असून त्यातील 400 जणांनी योग्य ते पुरावे देऊनही त्यांना प्रमाणपत्र दिली जात नसल्याचे यावेळी पुरावे देऊन सांगण्यात आले.
यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी आणि समाजकल्याणचे सहायक आयुक्त यांना सोमवारी बैठक घेऊन हा प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांनी पालकमंत्री सरनाईक यांची वाट मोकळी केली.