आरंभ मराठी / धाराशिव
एकाच दिवसात १५ लक्ष वृक्षलागवडीचे शिवधनुष्य धाराशिव जिल्हा प्रशासनाने हाती घेतले होते. हे शिवधनुष्य प्रशासनाने यशस्वीपणे पेलले असून ‘हरित धाराशिव’ या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमाची आज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.
यासह एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही या उपक्रमाची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा याबद्दल गौरव करण्यात आला.
आज (दि.१९) धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवसात १५ लक्ष वृक्षलागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत या उपक्रमातील ५ लाख वृक्षांची लागवड झाली.
आज सकाळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणा पाटील, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत शिंगोली येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला. धाराशिव जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हा उपक्रम सुरू आहे.
एकाच दिवसात तब्बल १५ लक्ष वृक्षांची लागवड करण्याचा हा उपक्रम एक जागतिक रेकॉर्ड ठरला असून, यामुळे धाराशिव जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर गौरविले जाणार आहे.
या उपक्रमात धाराशिव जिल्ह्यातील जवळपास २३४ ग्रामपंचायती, १० नगरपालिका आणि शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. शिंगोली येथील मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ५ हेक्टरवर वृक्षलागवड करण्यात आली. ‘एक पेड मां के नाम’ या नावाने सर्व लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिंगोली येथे वृक्षलागवड केली.