स्वारगेटच्या बस स्थानकातील घटनेचा परिवहन खात्याला विसर, धाराशिवच्या बसस्थानकात कोणते उद्योग चालतात..?, बसस्थानकाच्या बोगस कामांच्या चौकशीचे काय झाले ?
आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उद्घाटन झालेल्या धाराशिवच्या बसस्थानकात अडीच महिन्यानंतरही प्रवाशांना थांबता येणार नाही, अशी अवस्था. पण याच नव्या कोऱ्या बसस्थानकात रात्रीच्या अंधारात दारूड्यांचा अक्षरशः हैदोस सुरू आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतरही महामंडळ झोपेत आहे आणि बसस्थानकात ”रात्रीचे खेळ’ सुरू आहेत. विशेष म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
त्यांनी बसस्थानकाच्या बोगस कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. पण चौकशीचे काय झाले,याचे उत्तर महामंडळाचे अधिकारी देऊ शकत नाहीत. म्हणजे ही चौकशी गुंडाळली का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनी परिवहन मंत्री आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव शहरातील अपूर्ण काम झालेल्या बसस्थानकाचे उद्घाटन केले होते. बसस्थानकाचे पन्नास टक्के देखील काम पूर्ण झाले नसताना मंत्री महोदयांनी उद्घाटनाची घाई केली.
तेच तुळजापूर बसस्थानकाच्या बाबतीत झाले. तुळजापूर बस स्थानकासाठी आठ कोटी रुपये तर धाराशिव बस स्थानकासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून नवीन बसस्थानक बांधण्यात आले. मात्र त्याचे उद्घाटन करून अडीच महिने झाले तरी बस स्थानकाचे काम अजूनही सुरूच आहेत. ऐन पावसाळ्यात त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. अपुऱ्या कामाचे उद्घाटन केल्याबद्दल मंत्री सरनाईक यांच्यावर विरोधकांनी देखील टीका केली होती.
त्यानंतर मागील महिन्यात दिनांक १२ जून रोजी पालकमंत्री पुन्हा धाराशिव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे बस स्थानकाचे उद्घाटन करण्याची घाई केल्याचे कबूल केले होते. तसेच बसस्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट केले होते. मात्र ३५ दिवस होऊनही याप्रकरणी चौकशी समिती नेमली नसल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी चौकशी समितीच नेमली नसल्यामुळे दोषी कोण आहेत हे समोर येणार नाही त्यामुळे दोषींना वाचवण्यासाठीच चौकशी समिती नेमली नसल्याचा संशय व्यक्त होत आहे. पालकमंत्र्यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर देखील बोगस सिमेंट वापरून आतादेखील दर्जाहीन काम सुरूच आहे. सध्या सुरू असलेल्या कामावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनाच कुणी गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
चौकशी समितीची घोषणा हवेतच
बस स्थानकाच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची पालकमंत्र्यांनी एक महिन्यापूर्वी केलेली घोषणा हवेतच विरली आहे. याप्रकरणी कोणाची चौकशी समिती नेमली आणि त्या समितीने काय अहवाल दिला याची माहिती घेण्यासाठी ‘आरंभ मराठी’ने धाराशिव पासून ते मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयापर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशी कुठली चौकशी समितीच नेमली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये दोषींना वाचवण्याचे प्रयत्न नेमके कोण करत आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
वापरात नसलेले बसस्थानक तळीरामांसाठी मात्र ओपन बार
बस स्थानकाची सोलापूर फलाटाची एकच बाजू सध्या सुरू आहे. पहिल्या मजल्यावर स्त्री आणि पुरुष चालक-वाहकांसाठी वेगवेगळे दोन विश्रांती कक्ष तयार केले आहेत. परंतु, ते कुलूपबंद असून अजूनही सुरू केलेले नाहीत. मात्र, याठिकाणी ओपन बार सुरू असल्याचे दिसते. दारुसह मांसाहारी जेवण, चकना आणि इतर ‘बऱ्याच गोष्टी’ या विश्रांती कक्षात होत असल्याचे दिसते.
सीसीटीव्ही नसल्याचा पुरेपूर उपयोग करण्यात येत आहे. बस स्थानकाच्या स्लॅबवर देखील दारुच्या बाटल्यांचा अक्षरशः खच आहे. याठिकाणी कोणाचेच निर्बंध नसल्याने दारुसह आणखी दुसरेही बरेच ‘धंदे’ सुरू असल्याचे दिसून येते. खुद्द परिवहन मंत्री ज्या जिल्ह्याचे पालक आहेत त्याच जिल्ह्यात अनेक गंभीर प्रकार घडत आहेत. स्वारगेट ची घटना ताजी असताना देखील याप्रकरणी अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे.
उद्घाटन होऊन अडीच महिने झाले तरी कामे सुरूच
बसस्थानकाचे उद्घाटन होऊन अडीच महिने झाले तरीदेखील अजूनही बसस्थानकाची कामे सुरूच आहेत. शौचालयाचे काम अजूनही अर्धवट आहे. त्यामुळे महिलांसह वृद्धांची अडचण होत आहे. शौचालयाचे काम दिवाळीपर्यंत तरी पूर्ण होईल की नाही अशी शंका येत आहे. सोलापूर फलाटाकडील ११ पैकी ४ फलाटाचे काम आता करण्यात येत आहे. तर काँक्रीटीकरणाची एक संपूर्ण बाजू अजूनही तशीच आहे. काही ठिकाणी अजूनही फरशीचे काम सुरू आहे.