आरंभ मराठी / धाराशिव
ऑनलाईन गेमचा जुगार खेळवून आर्थिक फसवणुक करणाऱ्या पाच जणांवर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी धाराशिव, बीड आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील असल्यामुळे यामध्ये मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी की,
आरोपी उत्तरेश्वर दामोदर इटकर (वय 45 वर्षे, रा.सोनेसांगवी ता. केज जि. बीड), अस्लम दस्तगीर तांबोळी (वय 32 रा. शेळका धानोरा ता. कळंब), सुरज घाडगे (रा. सातेफळ ता. केज), नामदेव कांबळे (रा. अंबेजोगाई जि. बीड) आणि एम.डी. पाटील (रा. नांदेड) या पाच जणांनी दिनांक 1 जानेवारी 2025 ते 15 जुलै 2025 दरम्यान संगणमताने शासनाची बंदी असलेली बीडीजी ऑनलाईन गेम, दमन ऑनलाईन गेम व टी.सी. ऑनलाईन गेम या सारख्या ऑनलाईन गेमच्या लिंक व्हॉटसॲपद्वारे लोकांना पाठवून त्यांना कमी पैशात अधिक पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले.
तसेच त्यांनी ऑनलाईन गेमचा जुगार खेळवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनेक लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली. तसेच ऑनलाइन फसवणुकीचा त्यांचा खेळ आजही सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी सुरेश बापुराव कासुळे (सहा.
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सायबर) यांनी दिनांक 15 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 318 (4), 3 (5) सह कलम 66 (सी), 66 (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सह कलम 12 (अ) मुजुका अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.