गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात धाराशिव पोलिसांचे ऑपरेशन
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव –
गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात धाराशिव पोलिसांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली विशेष ऑपरेशन सुरू केले असून, मागील दीड महिन्यात पोलिसांनी याप्रकरणी मोठ्या संख्येने कारवाया केल्या आहेत.
गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, गोमांसाची वाहतूक आणि जनावरांच्या चामड्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांचे बारीक लक्ष असून, मागील ४० दिवसात २० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दीड महिन्यात कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या तब्बल ३३० गाईंची सुटका केली आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी मागील दीड महिन्यापासून गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जिल्ह्यात गाईंच्या अवैध वाहतुकीवर दररोज वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येत आहेत.
गोवंशीय जनावरांची वाहतूक, गोमांसाची वाहतूक आणि जनावरांच्या चमड्याची वाहतूक करणाऱ्या विरोधात मागील ४० दिवसात ३० पेक्षा अधिक आरोपींवर २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया होत असतानाही जिल्ह्यात दररोज कुठे न कुठे गाईंची वाहतूक होतच असल्याचे दिसते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ३३० गाईंची सुटका केली आहे.
तसेच तीन कारवाईत ७.५ टन गोमांस जप्त केले आहे. तसेच २५ गोवंशीय जनावरांचे चामडे देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईत तब्बल १ कोटी ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच २५ पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असला तरीदेखील अजूनही यावर आळा बसला नसून, दररोज कुठे न कुठे जनावरांची अवैध वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येते.
परंडा आणि धाराशिव हॉटस्पॉट
पोलिसांनी केलेल्या कारवाईत सर्वाधिक कारवाया परंडा आणि धाराशिव शहरात केल्या आहेत. गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीत परंडा तालुक्यात सर्वाधिक गुन्हे घडतात.
तर धाराशिव शहर आणि तालुक्यात गोमांस आणि चामड्याची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. मागील चाळीस दिवसात परंडा पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ८२ गाईंची सुटका केली तर १५०० किलो गोमांस जप्त केले आहे. तर धाराशिव तालुक्यात ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १४२ गाईंची सुटका केली तर ६ टन गोमांस आणि २५ जनावरांचे चामडे जप्त करण्यात आले आहे.
मागील ४० दिवसात झालेली कारवाई
२२ – गुन्हे दाखल
३३० – जनावरांची सुटका
२६ – वाहने जप्त
७५०० किलो – गोमांस जप्त
२५ – जनावरांचे चामडे जप्त
१ कोटी ५७ लाख ८४ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त.