जत्रेतील कुस्तीच्या फडात मल्लांशी संवाद साधताना घडला प्रकार,
भूम तालुक्यातील आंदरूड गावातील घटना
आरंभ मराठी / भूम
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर भूममध्ये हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून, भूम तालुक्यातील आंदरूड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या हल्लेखोरांचा वाशी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आंदरुड येथे यात्रेदरम्यान प्रसिध्द कुस्ती पटू थापाच्या कुस्तीवेळी हा घडला प्रकार घडला.यात्रेतील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन कुख्यात गुंड निलेश घायवळ याने केले होते,असे सांगण्यात येत आहे. आयोजक घायवळ आखाड्यात पैलवानांची भेट घेत असताना त्याच्यावर हल्ल्याचा प्रकार घडला आहे.
हल्ला करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान असल्याची माहिती समोर येत आहे.
निलेश घायवळ याच्यावर हल्ला करताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर हल्ला करणाऱ्या तरुणाला निलेश घायवळच्या कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केली.मात्र यादरम्यान हल्ला करणारा तरुण घटनास्थळावरून पसार झाला. वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
कोण आहे निलेश घायवळ ?
निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यातील एक कुख्यात गुन्हेगार आहे, जो ‘घायवळ टोळी’चा प्रमुख मानला जातो. त्याच्यावर खून, खंडणी, अपहरण, धमकी, आणि टोळीयुद्ध यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २३ ते २४ गुन्हे नोंदवले गेले आहेत.
निलेश घायवळ मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगावचा रहिवासी आहे. त्याने पुण्यात मास्टर ऑफ कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतले. पुण्यात आल्यानंतर त्याची ओळख गजानन मारणे या गुन्हेगाराशी झाली, आणि दोघांनी मिळून काही गुन्हे केले. त्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण होऊन, घायवळ टोळी आणि मारणे टोळी यांच्यात संघर्ष सुरू झाला.
घायवळच्या टोळीतील सदस्यांनी सोशल मीडियावर ‘Boss’ या नावाने व्हिडिओ आणि रिल्स शेअर करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या प्रकारावर कारवाई केली असून, त्याच्या गाड्यांवर ‘Boss’ लिहिलेल्या फॅन्सी नंबर प्लेट्स आणि काळ्या काचा लावल्यामुळे दंडही वसूल केला आहे.
राजकीय वर्तुळातही निलेश घायवळचे संबंध दिसून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
पोलिसांनी त्याच्यावर तडीपारी, एमपीडीए आणि मोक्का अंतर्गत कारवाई केली असून, त्याला अटकही करण्यात आली आहे.
निलेश घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याचे राजकीय संबंध यामुळे तो पुण्यातील एक चर्चित आणि वादग्रस्त व्यक्ती बनला आहे.