राजकीय क्षेत्रात खळबळ
आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर शहरातील ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी चार गोपनीय नावे पहिल्यांदाच समोर आणत ती उघड केली. सोमवारी या प्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी चार गोपनीय नावासह आणखी सहा नावे समोर आणली.
या नावात स्थानिक बड्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये विनोद ऊर्फ पिटू गंगणे यांच्यासह चंद्रकांत ऊर्फ बापू कणे, शरद जमदाडे, मिटू ठाकूर, प्रसाद कदम परमेश्वर, उदय शेटे यांचीही नावे आज उघड केली. या आरोपींना वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे.
याशिवाय गजानन हंगरकर, आबासाहेब पवार, आलोक शिंदे आणि अभिजित गव्हाड या फरार आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर केली. पोलिस सध्या 12 आरोपींचा शोध घेत आहेत.
सोमवारी पोलिसांनी सुलतान शेख (रा.पुणे), जीवन साळुंखे (रा. सोलापूर) आणि राहुल कदम परमेश्वर यांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणात एकूण 25 आरोपी असून यापैकी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 12 फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुळजापूर येथे विक्रीसाठी येणारे ड्रग्स तामलवाडी येथे पकडल्यानंतर पहिल्यांदा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
तुळजापूर शहरात हा धंदा गेली अनेक वर्ष सुरु असल्याचे बोलले जात होते. दरम्यान या प्रकरणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भुमिका घेत कोणाचीही गय करु नका असे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी जोरदार तपास सुरू केला आहे.
दरम्यान या प्रकरणात अजून काहीजण सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे करत आहेत.
एकही आरोपी सुटणार नाही –
ड्रग्ज प्रकरणाचा तपास गतिमान आहे. काही आरोपींची नावे तपासाच्या दृष्टीने गोपनीय ठेवणे आवश्यक होते त्यामुळे ती गोपनीय ठेवली होती. फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न असतील. यामध्ये तुळजापूर, सोलापूर, पुणे, मुंबई कनेक्शन आढळून आले आहे. जर धाराशिव आणि परंडा कनेक्शन असेल तर त्याचाही तपास केला जाईल. ड्रग्ज प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये असाच आमचा प्रयत्न आहे.
डॉ. निलेश देशमुख
उपविभागीय पोलीस अधिकारी.