जिल्ह्यातील १७ शिवभोजन केंद्र बंद होण्याच्या मार्गावर,
आरंभ मराठी / धाराशिव
कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली शिवभोजन योजना आता अंतिम घटका मोजत आहे. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी कमी पैशात स्वस्त आणि पौष्टिक भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी निधीची तरतूदच केली नसल्यामुळे शिवभोजन योजना ३१ मार्च नंतर बंद होण्याच्या मार्गावर आहे. धाराशिव शहरातील १० तर तालुका पातळीवरील ७ अशी जिल्ह्यातील १७ शिवभोजन केंद्र बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्य शासनाने २६ जानेवारी २०२० रोजी शिवभोजन योजना सुरू केली होती. कोरोना महामारीत या योजनेमुळे अनेकांना पोट भरता आले. मागील पाच वर्षापासून ही योजना चालू आहे. यातील काही केंद्र बंद झाली तरी प्रत्येक जिल्ह्यात ही योजना आजही सुरू आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा कोविड काळात झाला.
कोव्हिड काळात मोफत भोजन देण्यात आले. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मजूर, बेघर, वृद्ध, विद्यार्थी, अपंग आणि इतर गरजूंसाठी ही योजना उपयुक्त ठरली. आधार कार्ड दाखवत मोफत जेवण
मिळत असल्याने गोरगरिब नागरिकांच्या शिवभोजन केंद्रावर रांगा लागल्या होत्या. शासनाकडून प्रतिथाळी शहरासाठी ४० रुपये तर ग्रामीण भागात २५ रुपये शिवभोजन चालकांस अनुदान म्हणून दिले जाते.
शिवभोजन चालकांकडून दहा रुपयांत दोन पोळ्या, भाजी, वरण, भात, लोणचे असा शिवभोजन थाळीचा मेनू होता. दुपारी ११ ते ३ या वेळेत ही थाळी उपलब्ध करून दिली जाते. शहरी भागात अन्नधान्य वितरण अधिकारी तर ग्रामीण भागात शिवभोजन केंद्रावर जिल्हा पुरवठा कार्यालयाचे नियंत्रण आहे.
मात्र परवा जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शिवभोजन योजनेसाठी निधीची तरतुदच केली नसल्यामुळे केंद्र चालक संभ्रमात पडले आहेत. जिल्हा कार्यालयाकडे या संदर्भात कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत. गोरगरिबांच्या फायद्याची असलेली ही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याने केंद्र चालकांना कोडे पडले आहे.
जिल्ह्यात १७ केंद्रांवर जेवतात १६४५ नागरिक –
धाराशिव जिल्ह्यात सध्या एकूण १७ शिवभोजन केंद्र चालवले जातात. यामध्ये धाराशिव शहरात १० तर तालुका पातळीवर ७ केंद्र सुरू आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून दिवसाला १६४५ नागरिक दहा रुपयात जेवतात. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार, वृद्ध, अनाथ लोकांचा समावेश असतो. परंतु, शिवभोजन योजनेला अखेरची घरघर लागल्यामुळे ही सर्व केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
योजनेवर महिन्याला १९ लाख रुपये खर्च –
धाराशिव जिल्ह्यातील १७ केंद्रांवर सध्या १६४५ थाळ्या दिल्या जातात. शहरी भागातील केंद्रांना प्रति थाळी ४० रुपये तर ग्रामीण भागातील केंद्रांना प्रति थाळी ३५ रुपये अनुदान दिले जाते. ग्राहकांकडून दहा रुपये घेतले जातात. धाराशिव जिल्ह्यातील १७ केंद्रांना दिवसाला ६२ हजार ४५० रुपये अनुदान देण्यात येते. तर दर महिन्याला १८ लाख ७३ हजार ५०० रुपये शिवभोजन केंद्रांना अनुदान स्वरूपात प्राप्त होते. केंद्र चालकांना जानेवारी पर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. ३१ मार्च नंतर सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात निधीची तरतूदच नसल्यामुळे शिवभोजन केंद्र बंद होण्याची शक्यता आहे.
अजून सूचना नाहीत –
शिवभोजन थाळी बंद होण्याच्या संदर्भात राज्य पातळीवरून काहीच सूचना आलेल्या नाहीत. जे केंद्र सुरू आहेत त्यांना जानेवारी पर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्याची प्रक्रिया सुरू आहे. मार्च नंतर या योजनेचे काय होणार हे सूचना आल्यावरच कळेल.
स्वाती शेंडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी
धाराशिव.