ढोकी परिसरात चिकन – मटणाची दुकाने तीन आठवडे राहणार बंद
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे बर्ड फ्लू चा शिरकाव झाला असून, प्रशासनाने ढोकी आणि परिसरामध्ये अलर्ट झोन घोषित केला आहे. ढोकी परिसरातील
कावळ्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील पाच दिवसात २१ कावळे मृत्युमुखी पडले असून, प्रशासनाने आता उपाययोजना सुरू केल्या आहेत.ढोकी आणि परिसरात पुढील तीन आठवडे चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
ढोकी गावातील पक्षांना बर्ड फ्लू झाल्याचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेतून सोमवारी ( दि.२४) प्राप्त होताच प्रशासनाने त्या भागाला अलर्ट झोन म्हणून घोषित केले आहे. शुक्रवार (दि.२१) पासून ढोकी येथे सुभाष देशमुख यांच्या घराशेजारी तसेच ढोकी पोलीस स्टेशन परिसरात काही कावळे अचानक मृत्युमुखी पडत असल्याचे काही नागरिकांना दिसून आले होते. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ८ कावळे थोड्या थोड्या अंतराने मृत्युमुखी पडले होते. नागरिकांनी याची माहिती तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन विभागाला तात्काळ याची माहिती दिली.
पशुसंवर्धन विभागाने आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि वनविभाग यांच्या मदतीने मृत कावळ्यांना गोळा करून त्यातील दोन कावळ्यांचे नमुने भोपाळ येथील विषाणू प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवले. भोपाळ येथून सोमवारी कावळे बर्ड फ्लू मुळे मृत्युमुखी पडल्याचा अहवाल मिळाला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बर्ड फ्लू मुळे शनिवारी (दि.२२) ४ कावळे, रविवारी ३ कावळे, सोमवारी ३, मंगळवारी २ आणि बुधवारी १ असे आतापर्यंत एकूण २१ कावळे सलग मृत्युमुखी पडले आहेत. बर्ड फ्लू चा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.
प्रशासनाकडून अलर्ट झोन जारी –
सोमवारी भोपाळ येथून बर्ड फ्लू चा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच जिल्हा प्रशासनाकडून ढोकी परिसरात अलर्ट झोन जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009” आणि “Action Plan for Prevention, Control & Containment of Avian Influenza (Revised, 2021)” च्या तरतुदीनुसार ढोकी गावाच्या १० किमी परिघाला अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या या भागात स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे.
३६ पक्षांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवले –
कावळ्यांचे दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ढोकी परिसरातील कुक्कुटपालन आणि शेतकऱ्यांकडील पाळीव कोंबड्यांचे ३६ नमुने भोपाळला पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत एकाही कोंबडीचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले नाही. कोंबड्यांचा रिपोर्ट कधी येतोय याची प्रशासन वाट पाहत आहे. सध्या परिसरातील चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
१९ कावळे केले नष्ट –
मृत्युमुखी पडलेल्या २१ कावळ्यांपैकी दोन कावळे तपासणीसाठी भोपाळला पाठवले होते. इतर १९ कावळ्यांची वनविभागाच्या मदतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. गावापासून दूर खोल खड्डे खणून कावळ्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
चिकन सेंटर २१ दिवस बंद –
बर्ड फ्लू वर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ढोकी आणि परिसरातील सर्व चिकन सेंटर पुढील तीन आठवडे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व मांस विक्रेत्यांची ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन त्यांना आपली दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. सध्या मृत कावळे आढळलेला भाग निर्जंतुक केला जात आहे. बर्ड फ्लू मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची एकही घटना समोर आली नसली तरी लोकांना चिकन आणि अंडी खाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत –
ढोकी येथील कावळे बर्ड फ्लू मुळेच मृत्युमुखी पडल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व चिकन सेंटर शुक्रवार पासून तीन आठवडे बंद करण्यात आले आहेत. तसेच परिसर निर्जंतुक केला जात आहे. लोकांनी न घाबरता काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. कमलाकर शेळके
नोडल ऑफिसर, डिसीज कंट्रोल.