वनविभागाला वाघाचा पत्ता लागेना
रेस्क्यू टीमही गोंधळात
आरंभ मराठी / धाराशिव
दोन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात तळ ठोकलेला वाघ सध्या नेमका कोठे आहे याचा पत्ता खुद्द वनविभागाला देखील नाही. वनविभागाच्या गोंधळामुळे पुण्याहून आलेली रेस्क्यू टीमदेखील संभ्रमात पडली आहे. सध्या वाघ रामलिंग अभयारण्यात नाही आणि कामठा परिसरातही नाही मग वाघ नेमका गेला कुठे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात वनविभाग मग्न आहे. १७ फेब्रुवारीला शेवटचा दिसलेला वाघ त्यानंतर वनविभागाला दिसलेला नाही. त्यामुळे वाघ नेमका कोठे गेला याचा शोध सुरू आहे.
शनिवारी (दि.२२) रामलिंग अभयारण्यातील वाघ कामठा परिसरात दिसल्याची बातमी वनविभागाला देण्यात आली होती. येडशी येथील रामलिंग अभयारण्यामध्ये आढळलेला वाघ तुळजापूर तालुक्यातील कामठा येथे शनिवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान दीपक राऊत या शेतकऱ्यास दिसला होता. त्यांनी वनविभागाला ही माहिती दिल्यानंतर वनविभागाने यावर विश्वास ठेवला नाही.
मात्र, वाघाचे ठसे आढळून आल्यानंतर वनविभागाने वाघ याच परिसरात असल्याचे मान्य केले. शनिवारी रात्री आणि रविवार व सोमवार असे दोन दिवस पायपीट करूनही वाघाचा थांगपत्ता वनविभागाला लागला नाही. वनविभागाच्या सावळ्या गोंधळामुळे पुण्याहून आलेली रेस्क्यू टीम देखील हातावर हात देऊन बसली आहे. सध्या वाघाचा मुक्त संचार सुरू असून, कामठा, अपसिंगा, बेगडा आणि पोहनेर या भागातील शेतकरी मात्र घाबरलेले आहेत.
वाघ पकडण्याचे दूरच परंतु, वाघाचा थांगपत्ताही वनविभागाला लागत नसल्यामुळे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे. जवळपास गेल्या दोन महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यात वाघाचे
दर्शन होत आहे. येडशी व बार्शी येथील काही गावांमध्ये या वाघ दिसून आला होता. वन विभागाने प्रयत्न करूनही अद्याप पर्यंत वाघ सापडलेला नाही.
ज्वारी काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती –
सध्या शेतीतील रब्बीची कामे सुरू आहेत. सर्वत्र ज्वारी काढणीचे काम सुरू आहे. शेतकरी भल्या पहाटे शेतात कामाला जात आहेत. त्यातच शिवारात वाघ आल्यामुळे कामठा, अपसिंगा, बेगडा आणि पोहनेर या गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या ज्वारी, गहू, हरभरा काढणी सुरू असून,
शेतकऱ्यांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे.
वाघ रामलिंगला परत येईल – वनविभागाचा अजब दावा –
कामठा परिसरात गेलेला वाघ स्वतः रामलिंग अभयारण्यात परत येईल असा अजब दावा वनविभागाचे अधिकारी करत आहेत. मागील आठ दिवसात वाघाने शिकार केल्याची एकही घटना समोर आलेली नाही. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात १७ फेब्रुवारीला हा वाघ शेवटचा दिसला होता. त्यानंतर एक आठवड्यापासून हा वाघ गायब आहे.
उच्च तंत्रज्ञानाची मदत घेऊनही रेस्क्यू टीम अपयशी –
पुण्याची रेस्क्यू टीम उच्च तंत्रज्ञानाची मदत घेऊनही अपयशी ठरली आहे. दिनांक ६ फेब्रुवारी रोजी रामलिंग अभयारण्यात सर्वत्र
टॅब कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या टॅब कॅमेऱ्यामुळे वाघाच्या हालचाली रेस्क्यू टीमला मोबाईलमध्येही दिसतात. परंतु, तरीही वाघ हाती लागत नाही.
वाघाचा शोध सुरू आहे –
कामठा परिसरातून वाघ बेगडा शिवारात आला असल्याचे ठसे मिळाले आहेत. सध्या शोध सुरू आहे. कदाचित वाघाचा रामलिंग अभयारण्याकडे प्रवास सुरु असावा.
बी. ए. पौळ
विभागीय वन अधिकारी, धाराशिव.