अतिवृष्टी अनुदान मंजूर होऊन दोन महिने झाले तरी वितरण रखडले
पाच तालुक्यातील दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीच्या अनुदानापोटी २२१ कोटी ८१ लाख रुपये निधी वितरणास राज्य शासनाने १० डिसेंबर रोजी मान्यता दिली होती. परंतु दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना अनुदानाचे हे पैसे वितरित झालेले नाहीत. आतापर्यंत केवळ ४२ हजार शेतकऱ्यांना ६० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणखी दीड लाख शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासकीय नियमाला अनुसरून जिल्हा प्रशासनाने ८ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाला जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव पाठवला होता.
त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण बाधित १ लाख ६३ हजार ९७ हेक्टर क्षेत्रासाठी २२१ कोटी ८१ लाख रुपयांची मागणी केली होती. राज्य शासनाने त्याला १० डिसेंबर रोजी मान्यता दिली. त्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळण्याचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला होता.
परंतु दोन महिने होऊन गेले तरी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळण्याची प्रक्रिया संथ असल्याचे दिसते. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील २९ हजार ५७७ शेतकऱ्यांना ४५ कोटी ११ लाख आणि कळंब तालुक्यातील १२ हजार ९९१ शेतकऱ्यांना १४ कोटी ४७ लाख एवढ्याच अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. अजूनही जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार २१८ शेतकऱ्यांना १६० कोटी रुपये मिळण्यास दिरंगाई होत आहे. विशेष म्हणजे अनुदान वाटपास का उशीर होतोय याचे उत्तर प्रशासनाकडे देखील नाही. अनुदान मंजूर झालेल्या पाच तालुक्यांपैकी केवळ धाराशिव आणि कळंब तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. तर लोहारा, परंडा आणि वाशी या तीन तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला अनुदानाची रक्कम मिळाली नाही.
जिल्हा प्रशासनाने ८ ऑक्टोबर रोजी पहिला प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यात धाराशिव, कळंब, वाशी व परंडा या चारच तालुक्याचा समावेश होता. त्यासाठी निधी मंजूर करून दोन महिने होऊन गेले. परंतु, अद्याप शेतकऱ्यांना हे अनुदान मिळू शकले नाही. रब्बी हंगाम संपत आला तरी खरीप हंगामातील नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकलेले नाहीत.
लोहारा – उमरगा तालुक्यांचा प्रस्ताव आणखी मंजूरच नाही
सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली होती. तरीही प्रशासनाने फक्त धाराशिव, कळंब, वाशी आणि कळंब या चारच तालुक्यांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या मागणीनुसार प्रशासनाने दुसरा प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार लोहारा व उमरगा तालुक्यातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांना ८६ कोटी ४६ लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव १५ ऑक्टोबर रोजी शासनाकडे पाठवलेला आहे. परंतु त्या प्रस्तावावर आणखी काहीच निर्णय न झाल्याने दोन तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
तालुका – पात्र शेतकरी – केवायसी केलेले शेतकरी – अनुदान मिळालेले शेतकरी
१) धाराशिव – ६५६३३ – ६०५७३ – २९५७७
२) लोहारा – ३७० – ३१४ – ००
३) परंडा – १४३९५ – १२५१५ – ००
४) कळंब – ६५३३१ – ५९२०८ – १२९९१
५) वाशी – ३५०५७ – ३१०२५ – ००
एकूण १ लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांपैकी १ लाख ६३ हजार ६३५ शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घेतली आहे. त्यापैकी फक्त ४२ हजार ५६८ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे.
एकूण बाधित क्षेत्र – १ लाख ६३ हजार ९७ हेक्टर
एकूण शेतकरी – १ लाख ८० हजार ७८६
एकूण अनुदान रक्कम – २२१ कोटी ८१ लाख