वाघ टप्प्यात येऊनही रेस्क्यू टीमच्या हाती लागेना
वाघ पकडण्याच्या मोहिमेला एक महिना पूर्ण
आरंभ मराठी / धाराशिव
मागील दोन महिन्यांपासून धाराशिवच्या येडशी रामलिंग अभयारण्यात मुक्काम ठोकलेल्या वाघाने रेस्क्यू टीमला पुन्हा एकदा चकवा दिला. विशेष म्हणजे रेस्क्यू टीमने वाघाला पकडताना पहिल्यांदा रविवारी रात्री डार्ट गनचा वापर करून वाघाला शूट करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, अंधाराचा फायदा घेऊन वाघाने रेस्क्यू टीमला चकवा दिला. त्यामुळे टप्प्यात येऊनही वाघ हाती लागत नसल्यामुळे रेस्क्यू टीमला हा वाघ सापडतो की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या दोन महिन्यापासून बार्शी आणि धाराशिवच्या सीमेवर वावर असणाऱ्या वाघाने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेल्या टिपेश्वर येथून आलेल्या वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.
येडशी येथील पाणवठ्यावरील ट्रॅप कॅमेऱ्यात १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदाच या वाघाचे छायाचित्र कैद झाले. त्यानंतर मागील ५४ दिवसांत या वाघाने २८ पाळीव प्राण्यांवर हल्ले करून फडशा पाडला आहे. सध्या या वाघाचा वावर रामलिंग अभयारण्यात असून, पुण्याच्या रेस्क्यू टीमकडून वाघाला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
ताडोबाच्या टीमने दोन आठवडे वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. दोन वेळा वाघ ताडोबा टीमच्या टप्प्यात आला होता. परंतु त्या टीमने एकदाही डार्ट गनचा वापर वाघावर केला नव्हता. पुण्याच्या रेस्क्यू टीमकडून मात्र रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रामलिंग मंदिराच्या जवळ पहिल्यांदा डार्ट गनचा वापर करून वाघाला शूट करण्याचा प्रयत्न केला.
मात्र अंधारात असलेल्या वाघाला याची चाहूल लागताच वाघाने तेथून पळ काढला. त्यामुळे टप्प्यात आलेला वाघ रेस्क्यू टीमला चकवा देऊन निसटून गेला. गेल्या दोन महिन्यांपासून
धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात या वाघाचा वावर कायम आहे. मानवी वस्तीपासून सध्या हा वाघ दूर असला तरी पाळीव प्राण्यांना मात्र या वाघापासून मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाघाने आतापर्यंत कारी, चारे, येरमाळा – उक्कडगाव, चोराखळी तलाव, भानसाळे या परिसरात पाळीव जनावरांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेस्क्यू टीमचे वाघाला पकडण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वाघाने केलेल्या शिकारीवर बिबट्याचा डल्ला
मागील आठवड्यात चोराखळी शिवारात वाघाने एका बैलाची शिकार केली होती. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्या भागात तात्काळ जावून बैलाला फॉरेस्ट मध्ये ठेवले होते. शिकार केलेल्या वाघाला खाण्यासाठी वाघ पुन्हा त्या मृत बैलाजवळ येईल असा अंदाज व्यक्त करून रेस्क्यू टीमने त्या भागात ट्रॅप कॅमेरे लावून वाघाला पकडण्याची तयारी केली होती.
परंतु, वाघाने केलेल्या शिकारीवर बिबट्याने येऊन डल्ला मारल्यामुळे रेस्क्यू टीमच्या हाती पुन्हा निराशा आली. सध्या रामलिंग अभयारण्यात वाघासोबतच बिबट्याचा वावर असल्यामुळे रेस्क्यू टीमसमोर अडचण निर्माण झाली आहे.
डार्ट गनचा वापर दहा मीटरवरून
वाघाला जेरबंद करण्यासाठी डार्ट गनचा वापर दहा ते बारा मीटर वरूनच करावा लागतो. तीस ते पस्तीस फुटांवरून वाघाला शूट करणे मोठे कौशल्याचे काम असते. त्यात शूट करताना वाघाच्या मांडीला गोळी मारण्याचा प्रयत्न केला जातो.
इतरत्र शूट केल्यास वाघाला गंभीर इजा होऊन वाघाचा जीव जाण्याची शक्यता असते. पुण्याच्या रेस्क्यू टीममध्ये अनुभवी शार्पशूटर असले तरी रामलिंग अभयारण्यातील झाडी, चढउतार यांमुळे वाघाला शूट करणे रेस्क्यू टीमसाठी कठीण आहे. त्यामुळे एक महिना झाला तरी वाघ हाती लागत नाही.