आरंभ मराठी / धाराशिव
सोयाबीन खरेदीसाठी शासनाने दोन वेळा मुदतवाढ दिली. दुसऱ्यांदा दिलेल्या मुदतीचा गुरूवारी (दि.६) शेवटचा दिवस होता. परंतू खरेदी केंद्रावरील नियोजन कोलमडल्याने ग्रामीण भागातून सोयाबीन घेवून आलेल्या वाहनांच्या खरेदी केंद्रांवर रांगा पहावयास मिळाल्या. शुक्रवारी मुदत संपल्यामुळे एकही खरेदी केंद्र सुरू नव्हते.
त्यामुळे संतप्त झालेल्या तुळजापूर येथील शेतकऱ्यांनी धाराशिव येथील कार्यालयात येऊन जिल्हा पणन अधिकारी मनोज कुमार वाजपेयी यांना घेराव घातला. यावेळी वाजपेयी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना मुदतवाढ करण्यासंदर्भात निवेदन दिले.
सोयाबीन खरेदी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील २१ केंद्रावर १४ हजार २५७ शेतकऱ्यांची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी फक्त ४० टक्के शेतकऱ्यांची खरेदी करण्यात आली आहे तर ६० टक्के शेतकरी मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील २१ खरेदी केंद्रावर ३५ हजार ४०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार १५७ शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात आले होते. त्यामध्ये १४ हजार २५७ शेतकऱ्यांचे सोयाबीन प्रत्यक्षात खरेदी केले आहे तर २१ हजार १४६ शेतकरी मुदतवाढ मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.
नाफेडने जिल्हा पणन संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतमाल खरेदीसाठी २१ ठिकाणी खरेदी केंद्र उघडले. १५ ऑक्टोंबरपासून नाफेडने सोयाबीनची खरेदी सुरू केली. सुरूवातीला खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नंतरच्या काळात बाजारातील दर घसरल्याने नाफेडच्या केंद्राकडे खरेदी वाढली. अचानक खरेदी
वाढल्याने काही काळ बारदानाचा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. परंतू मागणीनंतर खरेदीला पुन्हा ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. वाढीव मुदतीत ५० टक्के शेतकऱ्यांची देखील खरेदी होऊ शकली नाही. आता खरेदीला मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुदतवाढ मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू –
धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे. तुळजापूर येथील शेतकऱ्यांनी मुदतवाढीसाठी निवेदन दिले आहे. आमच्या कडूनही शासनाकडे मुदतवाढ मिळावी अशी विनंती केलेली आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळेल अशी शक्यता वाटते.
मनोज कुमार वाजपेयी
जिल्हा पणन अधिकारी, धाराशिव.
जिल्ह्यातील 21 खरेदी केंद्रांची अंतिम आकडेवारी –
खरेदी केंद्र – एकूण नोंदणी – एसएमएस केलेले शेतकरी – खरेदी केलेले शेतकरी – राहिलेले शेतकरी
1) दास्तापुर – 1844 -1844 -1003 – 841
2) कळंब- 3679 – 1594 -1217 – 2462
3) गुंजाटी- 1614 – 905 – 341 – 1273
4) कानेगाव – 1930 – 1930 – 909 – 1021
5) सोनेवाडी – 1037 – 935 – 688 – 349
6) पारा – 526 – 449 – 287 – 239
7) परंडा – 353 – 348 -172 – 181
8) पाथरुड – 1013 – 1002 – 858 – 155
9) धाराशिव – 3379 – 1929 – 923 – 2456
10) ढोकी – 2318 – 1159 – 547 – 1771
11) चोराखळी – 2960 – 2320 – 1223 – 1737
12) उमरगा – 1788 – 904 – 996 – 792
13) नळदुर्ग – 800 – 798 – 317 – 482
14) भूम – 1790 – 1220 – 660 – 730
15) शिराढोण – 624 – 287 – 131 – 493
16) ईट – 1433 – 927 – 632 – 801
17) तुळजापूर – 1776 – 1403 – 486 -1290
18) कनगरा – 1609 – 1196 – 826 – 783
19) चिखली – 2592 – 1302 – 800 – 1792
20) टाकळी बेंबळी – 558 – 551 – 278 – 280
21) वाशी – 2180 – 2154 – 963 – 1217
एकूण – 35403 – 25157 – 14257 – 21146