आरंभ मराठी / धाराशिव
विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
सोमवारी सकाळी त्यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याने जरांगे पाटील यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोमवारी वेगवेगळ्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
जरांगे पाटील यांनी कालच महाराष्ट्रातील काही निवडक मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची यादी सकाळी जाहीर केली जाईल असे सांगितले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांनी आपण मराठा समाजाचे उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
जरांगे पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी ज्या मतदारसंघाची निवड केली होती, त्यामध्ये धाराशिव तसेच भूम-परंडा या मतदार संघाचाही समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यातील चारही मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार होती. आता मात्र जरांगे पाटील यांनी माघार घेतल्याने थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल. मराठा उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत, असे आवाहन पाटील यांनी समर्थकांना केले आहे.