आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आणि त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. शनिवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे तसेच त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजात सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मागणी तातडीने मान्य करावी तसेच त्यांचे उपोषण सुटण्यासाठी सरकारकडून तातडीने सकारात्मक प्रयत्न व्हावेत, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र बंदची हाक देण्यात येत आहे. शनिवारी बीड जिल्हा तसेच धाराशिव जिल्हा बंद करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकारात्मक मार्ग निघून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने सरकारला आवाहन करण्यात येत आहे.उद्याच्या बंदसाठी सर्व व्यापारी, आस्थापना, शाळा, महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.