आरंभ मराठी / धाराशिव
यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले. मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने देखील दमदार हजेरी लावली. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. जून महिन्यात राज्यात पावसाचा जोर कमी असला तरी धाराशिव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. जुलै महिन्यात तर 31 दिवसापैकी 25 दिवस दररोज कमी अधिक पाऊस झाला.
जुलै महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील काही छोटे प्रकल्प भरले. जुलै महिन्यात झालेल्या अधिकच्या पावसामुळे हलक्या जमिनीतील पिके पिवळी पडून वाया गेली आहेत. ऑगस्ट महिन्याची सुरुवातही पावसाने झाली. परंतु आता भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज जाहीर केला आहे.
ऑगस्ट महिन्यात धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पुढचे दहा दिवस म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. या काळात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. सध्या सोयाबीन हे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात सोयाबीन पिकाला ऊन आणि पाऊस दोन्हीची गरज असते. गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. पावसाचे ढग गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. शेंगा भरण्याच्या काळातच पावसात मोठा खंड पडला तर सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार पुढचे दहा दिवस म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत पावसाचा खंड असेल परंतु या काळात काही भागात हलका पाऊस पडू शकतो.
20 ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड
महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहील असा अंदाज आपण या पूर्वीच दिला होता. मान्सून चा आस असलेला पट्टा उत्तरेला सरकला आहे. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी कोणतीच प्रणाली विकसित होण्याचा अंदाज नाही. या सर्व घटकांचा विचार केला असता ऑगस्ट महिन्यात 20 तारखेपर्यंत पावसाचा खंड राहील असा प्राथमिक अंदाज आहे.
या काळात स्थानीक वातावरण निर्मिती झाली तर क्वचित् एखाद्या ठिकाणीं हलका पाऊस होऊ शकतो. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान केरळ किनारपट्टीच्या भागात एक कमी दाब निर्माण होईल असा प्राथमिक अंदाज आहे. हा कमी दाब पश्चिम दिशेला ओमान या देशाकडे जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. 22 ऑगस्ट च्या दरम्यान एक कमी दाब बंगालच्या उपसागरात निर्माण होईल व तो विशाखा पटनम मार्गे महाराष्ट्रात पाऊस देईल असा अंदाज आहे.
सुरज जयपाल जाधव,
हवामान अभ्यासक
रुईभर धाराशिव.