धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर, अनेक घरांसह वाहनांचे नुकसान
सुभाष कुलकर्णी / तेर
धाराशिव तालुक्यात चार दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.या वादळाने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले तर झाडे पडून अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. घरांवरील, गोठ्यावरील पत्रे उडल्याने अनेकजण बेघर झाले आहेत. धाराशिव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरे तसेच नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.या वादळाने आणखी एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
सांगवी (ता.धाराशिव) येथील हनुमंत अर्जुन कोळपे वय८४ यांचा रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यात पत्र्यावरील दगड डोक्यावर पडून जागीच मृत्यू झाला आहे,सांगवी येथील हनुमंत अर्जुन कोळपे नेहमीप्रमाणे राहत्या घरात झोपल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.
सांगवी परिसरात रविवारी रात्री तुफान अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरु झाला. या वाऱ्याने त्यांच्या घरावरील पत्रे उडाले. व पत्र्यावरील दगड कोळपे झोपलेल्या ठिकाणी म्हणजेच डोक्यावर पडल्याने हनुमंत कोळपे यांचा मृत्यू झाला.
खासदार ओमराजे, आमदार पाटील यांनी दिली भेट
घटनेची माहिती मिळताच मंडळ आधिकारी दत्ता कोळी,तलाठी सतीश निंबाळकर यांनी रात्री भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान रात्रीच खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच कोळपे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
गेली दोन दिवसापासून या भागात होत असलेल्या वादळी वाऱ्याने दारफळ रस्त्यावर झाडे मोडून तारा तुटल्या. त्यामुळे सांगवीत दोन दिवसापासून वीज नाही.नागरिकांना अंधारातच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा सामना करावा लागत आहे.
अनेकांच्या घरावरील पत्रे उडून आर्थिक नुकसानीबरोबर शेतातील झाडे उन्मळून पडली आहेत.