प्रतिनिधी / धाराशिव
शहरवासीयांना धावायला लावणारी आणि त्यांचे आरोग्य जपणारी धाराशिव हाफ मॅरेथॉन रविवारी सकाळी होत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरात जोरदार नियोजन करण्यात आले असून नोंदणी केलेल्या स्पर्धकांना शनिवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कीट वाटप केल्या जाणार आहेत. दरम्यान स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून आयोजकांसोबतच सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुल येथून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. याच ठिकाणी शनिवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ज्या स्पर्धकांनी मॅरेथॉनसाठी नाव नोंदणी केली आहे त्यांनीच टी-शर्ट, बिब इत्यादीचे किट घेण्यासाठी यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
26 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता स्पर्धकांनी श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावरती उपस्थित राहावे. सकाळी सहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे तसेच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सदरील मॅरेथॉन 5 किलोमीटर, 10 किलोमीटर व 21 किलोमीटर अशा तीन प्रकारात होणार आहे.
असा असेल मॅरेथॉनचा मार्ग
मॅरेथॉन स्पर्धा तुळजाभवानी क्रीडा संकुल या ठिकाणाहून सुरू होईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक (सेंट्रल बिल्डिंग), छत्रपती संभाजी राजे मार्ग (डी आय सी रोड), राजमाता जिजाऊ चौक (बार्शी नाका), हनुमान चौक, हातलाई देवी, घाटंग्री रोड व त्याच मार्गावरून परत येत नगरपालिकेच्या समोरून श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल या ठिकाणी समाप्त होईल. स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना मेडल देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांसाठी पाण्याची व व्यवस्था करण्यात आली आहे.
मॅराथॉनच्या मार्गावर ॲम्बुलन्स ( रुग्णवाहिका) व्यवस्था श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, महात्मा बसवेश्वर चौक (सेंट्रल बिल्डिंग), राजमाता जिजाऊ चौक (बार्शी नाका), हातलादेवी पायथा या ठिकाणी करण्यात आली आहे.