प्रतिनिधी / धाराशिव
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना प्रभाग क्रमांक १५ मधील रस्त्याच्या संदर्भात मागणीचे निवेदन देऊन रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जुन्नी गल्ली, देवकते गल्ली,कुंभार गल्ली अशा अनेक ठिकाणी भुयारी गटारीचे काम झाले असून या प्रभागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, सध्या पाऊस चालू असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून अपघात होत आहेत. यामुळे सदर रस्त्यावर रहिवाशी, शाळकरी मुले, नागरीक, वयोवृद्ध नागरिक यांचे हाल होत आहेत. मुरूम टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी सह्याद्री राजेनिंबाळकर, नरसिंग मेटकरी, आनंद मोरे, विनोद गिद्दे, हनुमंत शिंदे, हर्षद ठवरे आदी उपस्थित होते.