जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
आरंभ मराठी / नळदुर्ग
पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खून करणाऱ्या पतीला धाराशिवच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.दरम्यान,या खटल्यात प्रत्यक्षदर्शी आरोपींच्या मुलींची साक्ष महत्वाची ठरली.
सरकारी अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय भारत माळी व मयत गोजर यांना तीन मुली होत्या. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी पत्नीला नेहमी मारहाण व त्रास देत होता. चौथे अपत्य नको, असे गोजर हिने सांगितल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
१९ डिसेंबर २०२४ रोजी मयत गोजर हिने बहिणीस सांगितले होते की, घरातील वाद टाळण्यासाठी मी चौथे अपत्य होऊ देण्यास तयार आहे. त्यानंतर ती घरी परतली. त्याच दिवशी दुपारी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे भाऊ साक्षीदार शिवराम राम माळी घराजवळून जात असताना मयताच्या मुलींनी त्यांना सांगितले की, “पप्पांनी आईचा गळा दाबून कोयत्याने वार केले.”
शिवराम राम माळी यांनी तात्काळ घरात जाऊन पाहिले असता गोजर हिच्या गळ्यावर मोठी जखम होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मुलींनी दिलेल्या साक्षीत सांगितले की, वडिलांनी आधी आईचा गळा दाबला व नंतर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला हलविण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाला.
प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. ४८३/२०२४, भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक एस. डी. गिते यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. मयत महिला व आरोपी यांच्या अल्पवयीन मुली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होत्या. आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने व वैद्यकीय अहवाल न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासण्यात आले. सर्व पुरावे व अॅड. महेंद्र बी. देशमुख, जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता, धाराशिव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी धनंजय भारत माळी याला जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.








