चंद्रसेन देशमुख / धाराशिव
दक्षिणोत्तर भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी पहिली मागणी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. भाई उद्धवराव दादा पाटील यांनी केली होती. त्यानंतर या मागणीला महाराष्ट्रातील खासदारांनी बळ दिले. गेल्या 65 वर्षापासून होत असलेल्या या मागणीला आता कुठे बळ मिळत आहे. सोलापूर ते जळगाव- बुऱ्हाणपूर असा नियोजित मार्ग असला तरी पहिल्या टप्प्यात सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गाचे काम सुरू होत आहे. आज भाई उद्धवराव दादा पाटील यांचा स्मृतिदिन असून, या निमित्ताने दादांच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढच्या टप्प्यातील रेल्वेमार्गाला गती देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. धाराशिवला विकासाच्या टप्प्यावर आणण्यासाठी दादांनी या रेल्वेमार्गाची मागणी लावून धरली होती.
दक्षिण व उत्तर भारत रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी सध्या खांडवा-मनमाड-दौंड मार्गे सोलापूर असा मार्ग आहे. मात्र यामुळे साधारण ४५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर वळसा घालून दक्षिणेत जावे लागते. या पार्श्वभूमीवर 6 दशकापासून बुऱ्हाणपूर ते सोलापूर या रेल्वेमार्गाची मागणी होत आहे. यासाठीचे सर्व्हेक्षणही दहा वर्षांपूर्वी झाले. मात्र, त्यापैकी केवळ सोलापूर ते धाराशिव या रेल्वेमार्गाची घोषणा झाली असून उर्वरित मार्गाचा कालबद्ध कार्यक्रम कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या उत्तर भारतातून दक्षिण भारतात रेल्वेने जाण्यासाठी बुऱ्हाणपूर येथून जळगाव, मनमाड, दाैंड, कुर्डुवाडी मार्गे सोलापूरवरून खाली दक्षिणेत जावे लागते. दुसरा मार्ग नांदेड-हैदराबादवरून पुढे दक्षिणेत जातो. परंतु, हे दोन्ही मार्ग साधारण तीनशे ते चारशे किलोमीटरचा वळसा घालून दक्षिण भारतात जातात. या पार्श्वभूमीवर वळसा घालून जाण्याऐवजी थेट बुऱ्हाणपूर-मलकापूर-बुलढाणा-जालना-बीड-कळंब- धाराशिव-तुळजापूर-सोलापर हा रेल्वेमार्ग जोडल्यास सदरचे अंतर 400 किलोमीटरने कमी होऊन वेळेतही सहा ते सात तासांची बचत होणार आहे. यासाठी नागरिकांबरोबरच लाेकप्रतिनिधींच्या मागणीचा जोर कमी पडत असल्याने याबाबत सर्व्हेक्षणाच्या पुढे कोणतीही प्रगती होताना दिसत नाही. सोलापूर-धाराशिव या मार्गावरील कामाची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. आर्थिक संकल्पात तरतूद झाल्यामुळे कामाची लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.
२००८ मध्ये सोलापूर-जळगाव मार्गाचे सर्वेक्षण
सोलापूर ते जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण २००८ मध्ये करण्यात आले होते. यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी बजेटमध्ये तरतूद केली होती. नंतर मात्र कोणतीच प्रगती झाली नाही.वास्तविक, या मार्गावर ९ खासदारांचे मतदारसंघ आहेत तरीही पाठपुराव्याला बळ मिळत नाही. त्यात मराठवाड्यातील चार व पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेशमधील प्रत्येकी एका जिल्ह्यातून जाणाऱ्या या रेल्वेमार्गावरील भागात ९ मातब्बर खासदार संसदेत लोकप्रतिनिधीत्व करतात. त्यांच्याकडून एकत्रित प्रयत्नाची जोड दिल्यास नक्कीच या रेल्वेमार्गाला गती मिळू शकते. हा रेल्वेमार्ग सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, बुलडाणा आदी जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे दक्षीण-उत्तर प्रवास याच मार्गाने होणार असल्याने या मार्गावरील जिल्ह्यातील मागासलेपण दूर होण्यास मदत होणार आहे.
या रेल्वेमार्गासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते तत्कालीन खासदार भाई उद्धवराव पाटील यांनी १९६० मध्ये सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामार्फत या रेल्वेमार्गासाठी पहिली मागणी केली होती. त्यानंतरच्या काळात अनेक खासदारांनी तसेच रेल्वे लोकआंदोलन समितीनेही आपआपल्या पातळीवर प्रयत्न केले. परंतु हे काम सरकू शकले नाही.
असा होईल फायदा
सोलापूर ते बुऱ्हाणपूर रेल्वेमार्ग झाल्यास या मार्गावरील मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्याच्या विकासांना चालना मिळणार आहे. तसेच दक्षीणेतून उत्तरेकडे अथवा उत्तरेतून दक्षिणेत जाणाऱ्या नागरिकांचे ४५० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. यासाठी राजकीय पाठबळाची गरज आहे, अशी अपेक्षा रेल्वे लाेकआंदोलन समितीचे अध्यक्ष प्रभाकर निपणीकर यांनी व्यक्त केली.