आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने खाते उघडले असून, प्रभाग क्रमांक तीन मधून डॉ. अनुजा अजित कदम परमेश्वर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. मात्र प्रभाग क्रमांक तीन मध्ये महिला उमेदवारांचे दोनच अर्ज दाखल होते.
त्यातील एका उमेदवारांनी माघार घेतल्याने डॉ. अनुजा अजित कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे हे या प्रभागात किंगमेकर ठरले असून, आगामी निवडणुकीत देखील भाजपा बहुमताने विजयी होण्याचे विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. उच्चशिक्षित असलेल्या डॉ. अनुजा कदम यांनी एम.बी.बी.एस. शिक्षण पूर्ण केले असून, पुण्यातील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम.बी.बी.एस. ही पदवी प्राप्त केली आहे.
उच्चशिक्षित उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरल्या असल्याने तुळजापूरच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात डॉ अनुजा कदम या बिनविरोध निवडून आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे .
प्रभाग क्रमांक तीन जिजामाता नगर व परिसरातील आहे. या प्रभागात विनोद गंगणे यांचे कायमच वर्चस्व राहिले असून, सर्वप्रथम विनोद गंगणे हे जिजामाता नगर येथूनच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे गंगणे कुटुंबीयांनी केलेल्या कार्याचा फायदा येथे झाल्याचे बोलले जात आहे.









