तुळजापूर / सुरज बागल
तुळजापूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाजपाकडून माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज दाखल केला आहे. तर विजय शामराज यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
तसेच नगरसेवक पदासाठी एकूण 29 उमेदवारांचे 56 अर्ज शनिवारी दाखल झाले असून, रविवार आणि सोमवार हे दोन दिवस अर्ज भरता येणार आहेत. निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मंजुरी दिल्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मोठी गती आली असून, आगामी दोन दिवसात उर्वरित अर्ज भरण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कोण उमेदवारी दाखल करणार? या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून, भाजपचे ताकदवर नेते माजी नगरसेवक विनोद गंगणे हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आता मोठी रंगत आलेली पाहायला मिळत आहे.
भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी विविध नावांची चर्चा सुरू होती. मात्र, यामध्ये सर्वात अग्रेसर असलेले नाव म्हणजे माजी नगरसेवक विनोद गंगणे यांचे होते. गंगणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी केली होती. अखेर भाजपकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात आली असून, गंगणे समर्थकांमध्ये आता उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
गंगणे हे 2006 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2011 व 2016 मध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली होती. तुळजापूर शहरातील एक मातब्बर नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या उमेदवारीमुळे तुळजापूर नगरपरिषद निवडणुक मोठी रंगतदार होण्याची शक्यता आहे.









