आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज (दि. २३ जानेवारी) अंतिम दिवस असून, जिल्ह्यातील आठही तालुक्यांत आज मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या चार तासांच्या कालावधीत नेमकी राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असल्याने सर्व पक्षांचे लक्ष उमेदवारी माघारीकडे लागले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी झाल्याची घोषणा दोन्ही बाजूंनी करण्यात आली असली, तरी आजपर्यंत दोन्ही आघाड्यांनी एकही संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यामुळे ही युती आणि आघाडी प्रत्यक्षात कितपत अस्तित्वात आहे, असा प्रश्न कार्यकर्ते आणि मतदारांच्या मनात निर्माण झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५५ जागा आणि पंचायत समितीच्या ११० जागांसाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २३, २४ आणि २७ जानेवारी असे तीन दिवस देण्यात आले आहेत. त्यापैकी दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या २६ उमेदवारांनी तर पंचायत समितीच्या ३२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर माघारी अद्याप झालेल्या नाहीत.
महायुतीत विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एबी फॉर्मवरून मागील तीन दिवसांत मोठा राडा झाला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांच्या धाराशिव दौऱ्यात शिवसैनिकांशी संवाद साधत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे त्यांनी भाजप आमदार राणा पाटील यांची भेट घेऊन महायुतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले.
प्रताप सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गटांपैकी भूम–परंडा–वाशी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला १३ जागा, तर उर्वरित तीन विधानसभा क्षेत्रांतील १० जागा, अशा एकूण २३ जागा शिवसेनेला मिळणार आहेत.
मात्र प्रत्यक्षात या २३ जागांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपने अधिकृत उमेदवार उभे केल्याची माहिती समोर येत आहे. हाच प्रकार पंचायत समितीच्या जागांबाबतही दिसून येत आहे. पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ११० पैकी ५० पंचायत समिती गण शिवसेनेला मिळाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे आज ११ ते ३ या वेळेत भाजपचे किती उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे शिवसेनेचे बारकाईने लक्ष असणार आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र आहे. आघाडीत असलेल्या तीनही पक्षांमध्ये जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मागील दोन दिवसांत अशा बंडखोरांशी चर्चा करून अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न सुरू होते. यापैकी किती उमेदवार माघार घेतात, यावर महाविकास आघाडीची ताकद ठरणार आहे.
या सगळ्यात आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी तेर आणि केशेगाव या दोन्ही जिल्हा परिषद गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अचानकपणे आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. पक्षानेही या दोन्ही ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.
मात्र अर्चनाताई पाटील यांचे अपक्ष म्हणून दाखल केलेले अर्ज अद्याप कायम आहेत. त्यामुळे त्या आज उमेदवारी मागे घेतात की अपक्ष म्हणून मैदानात राहून निवडणुकीत ट्विस्ट निर्माण करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर दुपारी ३.३० वाजता उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यामुळे आज सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत धाराशिवच्या राजकारणात मोठ्या उलटसुलट घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषदेसाठी ९१३ उमेदवार अजूनही मैदानात –
जिल्हा परिषदेसाठी एकूण ५५ जागांसाठी ९१३ उमेदवार अद्यापही निवडणूक रिंगणात असून यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय पाहता धाराशिव तालुक्यात सर्वाधिक २३८ उमेदवार रिंगणात आहेत. कळंब तालुक्यातून १५२ उमेदवार निवडणूक लढवत असून तुळजापूर तालुक्यातून १३६ उमेदवार मैदानात आहेत. उमरगा तालुक्यात ११६, परंडा तालुक्यात ९१, भूम तालुक्यात ८५, लोहारा तालुक्यात ५० तर वाशी तालुक्यात ४५ उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. यातील किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंचायत समितीसाठी १,२९० उमेदवार अजूनही रिंगणात –
पंचायत समितीच्या एकूण ११० जागांसाठी तब्बल १,२९० उमेदवार अजूनही निवडणूक रिंगणात असल्याने याठिकाणीही चुरस निर्माण झाली आहे. तालुकानिहाय माहिती पाहता धाराशिव तालुक्यातून सर्वाधिक २६१ उमेदवार पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. कळंब तालुक्यात २११, तुळजापूर तालुक्यात १९२, उमरगा तालुक्यात १८७ उमेदवार मैदानात आहेत. परंडा तालुक्यात १४५, भूम तालुक्यात १३१, लोहारा तालुक्यात ९८ तर वाशी तालुक्यातून ६५ उमेदवार पंचायत समिती निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. आज यातील किती उमेदवार माघार घेतात याकडेही लक्ष लागले आहे.








