अपघातात किया कारचा चक्काचूर, जखमींवर धाराशिव शहरात उपचार सुरू
आरंभ मराठी / धाराशिव
छत्रपती संभाजी नगरकडून धाराशिवच्या दिशेने येणाऱ्या भरधाव किया कंपनीच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
ही दुर्घटना धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येडशी बायपासवर आज सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात किया कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. भरधाव कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेला कंटेनरवर जाऊन आदळली.
त्यात कंटेनरच्या डिझेलची टाकी फुटून नुकसान झाले. जखमींना धाराशिव शहरातील पल्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार छत्रपती संभाजी नगरकडून धाराशिवच्या दिशेने येणाऱ्या भरधाव किया कंपनीच्या कारच्या चालकाचा ताबा सुटून कार डिव्हायडरला धडकली.
त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर जाऊन धडकली.त्यानंतर प्रचंड वेगात असलेली कार पलटी झाली. यात कारमधील प्रवासी अशोक बोरुडे (६०), नितेश बोरुडे (३५),आराधना बोरुडे (३०), सतीश बोरुडे (३७, रा.कोपरगाव) हे जखमी झाले असून,त्यांच्यावर धाराशिव शहरातील पल्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.अशोक बोरुडे यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.