प्रतिनिधी / शिराढोण
कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू झाले असून, विशेष बाब म्हणून कोर्सला मान्यता मिळाली आहे.सदरील प्रशिक्षण कोर्सला हसेगावचे भूमिपुत्र तथा सहाय्यक कौशल्य विकास आयुक्त मंत्रालय संतोष राऊत यांनी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी ते म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. सदरील प्रशिक्षण मोफत आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात डॉक्युमेंटेशन एक्झिक्युटिव्ह हा कोर्स घेण्यात आला आहे. सदरील प्रशिक्षण कोर्स तीन वर्ष घेण्यात येणार आहे. तीनशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यावेळी सपोनि कल्याण नेहरकर यांची उपस्थिती होती. शिराढोणच्या सरपंच श्रीमती लक्ष्मीताई म्हेत्रे, रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष नामदेव माकोडे, सुरेश महाजन, राजेंद्र गुरव, पवन म्हेत्रे,तसेच ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाईचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, नवनाथ खोडसे, ग्रामपंचायत कानडी माळीचे सरपंच अशोक राऊत, बोरगावचे सरपंच गव्हाणे, अंकुश राऊत, बिभीषण राऊत, केंद्राचे संचालक ऋषिकेश गुळमे, सचिन कोंडेकर आदींसह प्रशिक्षणार्थी व गावकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अभ्यासक्रम सुरू व्हावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, भाजपा नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सरोजिनी राऊत यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. कळंब तालुक्यातील एकमेव ग्रामीण विकास केंद्र तालुक्यात स्थापन करण्यात आलेले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.