मागेल त्याला सौर पंप योजनेला खीळ,
अर्ज केलेल्या ६२ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा
आरंभ मराठी / धाराशिव
राज्य शासनाच्या वतीने ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेखाली धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन रक्कम भरून दीड ते दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत सोलर पंपासाठी कंपनीची निवड करण्यासाठी चॉइस मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १७ हजार शेतकऱ्यांनी ५० कोटींपेक्षा अधिक ऑनलाइन पेमेंट करूनही त्यांच्या अर्जावर विचार होत नाही तर दुसरीकडे जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी सोलार पंप कधी मिळतो याची वाट पाहत आहेत.
शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी वीज उपलब्ध व्हावी,यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना अत्यंत संथगतीने राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून तीन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ६२ हजार शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. यामध्ये वीजवितरण कंपनीकडून ९००० लोकांना अप्रूव्हल दिले असले तरी प्रत्यक्षात सौरपंप बसविण्यास विलंब होत आहे. दरम्यान, अजूनही हजारो शेतकरी मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत अगोदर शेतकऱ्यांसाठी मेडा आणि कुसुम या योजनेअंतर्गत सौर कृषी पंप दिले जात होते.
यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली होती; परंतु नवीन योजना आल्यानंतर जुन्या सर्व शेतकऱ्यांना नवीन योजनेमध्ये वर्ग केले. यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर वीजवितरण कंपनीकडून पेमेंट भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मेसेज येतात. शेतकऱ्यांनी संबंधित पोर्टलवर पेमेंट केल्यानंतर विभागीय कार्यालयाकडून अप्रूव्हल दिले जाते. त्यानंतर पुन्हा लाइनमनकडून आयडी तयार करून दिला जातो. नंतर पुन्हा विभाग कार्यालयावर संबंधित अर्ज पाठविला जातो.
त्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्यांची निवड करून सौर कृषी पंप पुरविणाऱ्या कंपन्यांना कळविले जाते. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत गोंधळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यंदा मुबलक पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली आहे. रब्बी लागवड आणि ऊसाचे क्षेत्रही यंदा वाढले आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढल्याने अनेक शेतकऱ्यांना सौरपंपाची गरज आहे. त्यामुळे मागेल त्याला सौरपंप योजनेअंतर्गत अनेकांनी साधारण दोन-तीन महिन्यांपूर्वी सोलार पंपासाठी अर्ज भरले होते.
दरम्यान, निवडणूक काळात काही दिवस या योजनेची साइट बंद झाली होती. महावितरण पोर्टलची साइट सद्यःस्थितीत व्यवस्थित सुरू आहे. यात सोलार पंपासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचा पर्याय आहे; परंतु पुरवठादार निवडण्याचा कोणताही पर्याय येत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
पुरवठादार पर्याय केवळ काही वेळेसाठीच होतो उपलब्ध –
पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना पुरवठादार कंपन्यांची निवड करण्यासाठी मेसेज येतो. मेसेज मिळाल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन पुरवठादार कंपनी निवडावी लागते. सध्या फक्त एकच कंपनीचा पर्याय उपलब्ध होतो. तोदेखील पाच मिनिटांसाठी येतो नंतर पुन्हा कोटा समाप्त झाला अशी सूचना येते. पुरवठादार कंपन्यांची संख्या तीसपेक्षा अधिक असताना धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ एकाच कंपनीचा पर्याय का उपलब्ध होतो याचे उत्तर महावितरण कडून मिळत नाही.
१७ हजार शेतकऱ्यांनी भरली ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम –
धाराशिव जिल्ह्यात मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १७००० आहे. या शेतकऱ्यांनी ५० कोटींपेक्षा अधिकची रक्कम महावितरणकडे भरलेली आहे. ही रक्कम भरून दोन ते तीन महिन्यांचा काळ उलटून गेलेला आहे. तरीही या शेतकऱ्यांना पुरवठादार कंपनीची निवड करता येत नाही. त्यामुळे शेतकरी संतापले असून महावितरण कडून मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही.
स्क्रुटिनीची गती मंद –
योजनेत अर्ज केल्यानंतर आलेल्या अर्जाची वेगवेगळ्या पातळीवर स्क्रुटीनी केली जाते. त्याची गती मंद असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात या योजनेला गती मिळत नसल्याचे दिसते. सध्या ६२००० शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. त्यातील केवळ १२००० शेतकऱ्यांच्या अर्जाची स्क्रुटीनी झाली आहे. दिवसाला एक हजार अर्जांची देखील स्क्रुटीनी होत नाही त्यामुळे अर्ज भरलेल्या ६२००० शेतकऱ्यांचा नंबर यायला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
मुख्यमंत्री म्हणतात पंधरा दिवसात पंप मिळतो –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेबद्दल मागील महिन्यात अर्ज केल्यापासून पंधरा दिवसात सोलार पंप मिळतो असे वक्तव्य केले होते. वास्तविक अर्ज करून एक वर्ष आणि पेमेंट करून तीन महिने झाले तरी शेतकऱ्यांना सौर कृषिपंप मिळत नाही. महावितरण विभागाकडून या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याची असलेली ही योजना शेतकऱ्यांसाठीच डोकेदुखी बनली आहे.
योजनेची जिल्ह्यातील आकडेवारी –
आलेले एकूण अर्ज – ६१७१८
पेमेंट केलेले – १७००४
स्क्रुटीनी झालेले – ११४७३
अप्रुव्हल – ८९९८
पुरवठादार कंपनीची निवड – ४७१४
पंप बसवलेले – ००