नेम चुकल्यानंतर थांबलेली मोहीम सोमवारपासून सुरू होणार,
महिना लोटला, वाघ सापडेना, आता टीम विभक्त होणार
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्यात दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेल्या टिपेश्वर येथून आलेल्या वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. वाघाला पकडण्याची मोहीम १४ जानेवारी रोजी सुरू केली होती. परंतु एक महिना झाला तरी वनविभागाला हा वाघ चकवा देत आहे.
दरम्यान, रविवारी रात्री डार्ट गनचा प्रयोग केल्यानंतर रेस्क्यू टीमने वाघाची शोध मोहीम थांबवली होती. आता रेस्क्यू टीम विभक्त करून दोन टीम केल्या जाणार असून, दोन्हीच्या प्रयत्नातून सोमवारपासून पुन्हा एकदा वाघाची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
येडशी येथील पाणवठ्यावरील ट्रॅप कॅमेऱ्यात १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदा वाघाचे छायाचित्र कैद झाले होते. वाघ पाहिल्यानंतर वनविभागाची देखील झोप उडाली होती. त्यापूर्वी भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर हल्ला करणारा देखील वाघच होता.
वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांना हे माहिती असूनही त्यांनी ही गोष्ट बाहेर येऊ दिली नाही. परंतु पंधरा दिवसानंतर १९ डिसेंबर रोजी बिबट्या साठी लावलेल्या ट्रॅप कमेऱ्यात वाघ दिसल्यानंतर वन विभागाने २२ डिसेंबर रोजी वाघ पकडण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली. १० जानेवारी रोजी राज्य सरकारने वाघाला पकडण्याची परवानगी दिली. वाघ पकडण्यासाठी ताडोबा येथील १० जणांची अनुभवी रेस्क्यू टीम १३ जानेवारी रोजी रामलिंग अभयारण्यात दाखल झाली.
या टीमने यापूर्वी ८२ वाघ पकडले होते. १४ जानेवारीपासून धाराशिव आणि सोलापूर वनविभागाच्या मदतीने या टीमने वाघ पकडण्याची मोहीम सुरू केली. या टीमने फक्त आठ दिवस वाघाचा शोध घेतला. या काळात दोन वेळा वाघ रेस्क्यू टीमच्या टप्प्यात आला होता. परंतु त्याच्यावर डार्ट गनचा वापर करता आला नाही.
विदर्भात वाघांचे मृत्यू वाढल्यामुळे या टीमला २२ जानेवारीला परत पाठवण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारी पासून पुणे येथील आठ जणांच्या रेस्क्यू टीमकडे वाघ पकडण्याची जबाबदारी दिली. विशेष म्हणजे बिबट्या पकडणाऱ्या टीमकडे वाघ पकडण्याची जबाबदारी दिली आहे.
गेली तीन आठवडे या टीमला अजूनही वाघ सापडलेला नाही. वाघाने आतापर्यंत ५५ दिवसांत २८ पाळीव प्राण्यांवर हल्ले करून फडशा पाडला आहे. अजूनही वाघाची दहशत तशीच असून, वाघ नेमका कधी सापडणार हे वनविभागाला देखील सांगता येत नाही.
९ फेब्रुवारीला डार्ट गनचा वापर पण नेम चुकला
महिनाभर वाघाला पकडणाऱ्या रेस्क्यू टीमकडून रविवारी हाती आलेली संधी गेली. रविवारी (दि.९) येडशी अभयारण्यातील रामलिंग मंदिर परिसरात वाघ टप्प्यात आला होता. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाघावर डार्ट गनचा वापर करून शूट केले. परंतु, वाघाने तेथून पळ काढला.
आता ऑनलाईन टॅब कॅमेऱ्यांची मदत
वाघाने हल्ला केलेल्या ठिकाणी ऑनलाईन टॅब कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वाघाच्या हालचाली मोबाईलमध्येही दिसणार आहेत. त्यामुळे वाघ दिसताच तात्काळ ताब्यात घेण्यास मदत होणार आहे. रेस्क्यू टीमकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊनही वाघ गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे.
वाघ दररोज जागा बदलतोय
बार्शी आणि धाराशिव सीमा भागातील गावांमध्ये पाळीव जनावरांवरती हल्ला करून दहशत माजवणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी तात्काळ केंद्रस्तरावरून हालचाली झाल्या तसे आदेशही निघाले. वन विभाग देखील कामाला लागले. सुरुवातीला ताडोबा रॅपिड रेस्क्यू फोर्स वाघाला पकडण्यासाठी आली होती. त्या टीमने दोन आठवडे प्रयत्न केले परंतु, वाघ हाती लागला नाही. आता बावधन रेस्क्यू टीम वाघाला पकडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र वाघ दररोज भाग बदलत हल्ले करीत असल्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
वारंवार चकवा देत असल्यामुळे वाघ हाती लागेना
वाघाला पकडण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. वाघ वारंवार चकवा देतोय हे खरं आहे. वाघ तीनवेळा टप्प्यात आला होता. परंतु हाती लागला नाही. आता दोन टीमकडून प्रयत्न केले जाणार आहेत. काही दिवसात वाघ हाती लागेल.
बी. ए. पौळ,
विभागीय वन अधिकारी, धाराशिव