उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या बैठकीला 4 पैकी 3 आमदार उपस्थित, डॉ.सावंतानी पाठ फिरवली
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्याच्या उद्योगाच्या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या महत्वपूर्ण बैठकीला भूम- परंडा- वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा.तानाजी सावंत यांनी दांडी मारत जिल्ह्याच्या प्रश्नावर गांभीर्य नसल्याचे दाखवून दिले आहे. अल्प मतांनी मिळालेला विजय डॉ. सावंत यांच्या जिव्हारी लागला असून, विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ते नाराज असल्याची चर्चा असतानाच मंत्रिपद न मिळाल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढली आहे .
त्यामुळे त्यांनी मतदारसंघाकडेही पाठ फिरवली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जिल्ह्याच्या महत्वाच्या नियोजन समितीच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले तर उद्योगाच्या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली. या बैठकीला आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते.
जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारण्याची गरज असून, त्यामुळे जिल्ह्यातून मुंबई- पुण्याकडे वाढणारे स्थलांतर रोखले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांची कमालीची अनास्था दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष आहे. नीती आयोगाच्या यादीत समाविष्ट असलेल्या धाराशिव जिल्ह्याला यातून बाहेर काढण्यासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असताना लोकप्रतिनिधी अनास्था दाखवत असतील, जिल्ह्याच्या महत्वाच्या प्रश्नावर आयोजित बैठकीला दांडी मारत असतील तर विकासाचा अनुशेष भरून कसा निघणार, हा प्रश्न आहे.
आमदार म्हणून मतदारांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येण्याऐवजी मंत्रिपदासाठी नाराज होत मतदारसंघाकडे पाठ फिरवून लोकप्रतिनिधी मतदारांचा घोर अपमान करत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा राग मतदारांवर का काढावा, लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांनी निवडून दिलेले असताना त्यांचे प्रश्न समजून घेण्याऐवजी नाराजीतून मतदारसंघाकडे फिरकायचेच नाही, विकासाच्या मुद्द्यावर बैठकीत सहभाग घ्यायचा नाही, हा प्रकार गंभीर असून, मतदारांच्या प्रश्नाची जाणीव नसल्यास पुढच्या काळात मतदारांनी आपल्याकडे पाठ का फिरवू नये, असा प्रश्न विचारला जात आहे.
नियोजन समितीच्या बैठकीला दांडी, आता उद्योगाच्या प्रश्नावर बैठकीत सहभाग नाही,
गेल्या महिन्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला 4 पैकी 3 आमदार उपस्थित राहिले. प्रा. डॉ.तानाजी सावंत या बैठकीला उपस्थित नव्हते.त्यानंतर बुधवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या उद्योगाच्या प्रश्नावर महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती या बैठकीला देखील 4 पैकी 3 आमदार उपस्थित होते. प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
वास्तविक पाहता आमदार सावंत यांनी विधानसभेच्या निकालपासून धाराशिव जिल्ह्याकडे पाठ फिरवली असून, कमी मतांनी निवडून आल्याबद्दल मतदारांवर आणि मंत्रिपद न मिळाल्याने पक्षावर नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात देखील ते सहभागी झाले नाहीत. शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली.मात्र एकाही कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले नाही.