आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर येथे होत असलेल्या ड्रग्ज तस्करी व सेवनाच्या विरोधात तुळजापूर येथील पुजारी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तुळजापूर शहरातील ड्रग्ज रॅकेट मोडुन काढा अशी विनंती पुजारी बांधवांनी पोलिसांना केली आहे.
यावर पोलिसांनी काही पुजाऱ्यांनाच धमकावले असल्याचा आरोप पुजारी बांधवांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर केला.
गुरुवारी (दि.२०) पालकमंत्री सरनाईक हे तुळजापूर दौऱ्यावर आले असता काही पुजाऱ्यांनी त्यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली.
यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा पारा चांगलाच चढलेला दिसला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यासमोरच सरनाईक यांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्यावर संताप व्यक्त केला.
पुढच्या ७२ तासांच्या आत मला ड्रग्ज प्रकरणावर लेखी अहवाल पाहिजे, पोलीस पुजाऱ्यांना धमक्या का देत आहेत? पालकमंत्र्यांच्या समोरच तुम्ही तक्रारदारांना धमक्या देता? मग या ड्रग्ज प्रकरणात पोलीस सहभागी आहेत का? नाही, तर पुजाऱ्यांनी धमक्या देणं बंद करा आणि या प्रकरणाची चौकशी करा अशा शब्दात सरनाईक यांनी पोलिसांना सुनावले.
आरोपी कोणीही असो, त्याला ताब्यात घ्या, हे ड्रग्ज प्रकरण मी गांभीर्याने घेतले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गांभीर्याने घेतले आहे, त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जावा असा आदेश सरनाईक यांनी पोलिसांना दिला. यावेळी पालकमंत्री रागाने लालबुंद झाले होते. तुळजापूरचे हे ड्रग्ज प्रकरण पोलिसांना चांगलेच तापदायक ठरणार असे दिसते.